गांगलगावला कायमस्वरुपी तलाठी मिळेल का हो? रायुकाँचे ऋषिकेश म्हस्के पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन

 
Fgcch
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या पाच महिन्यांपासून तालुक्यातील गांगलगाव येथील कायमस्वरुपी तलाठ्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषिकेश म्हस्के पाटील यांनी १८ ऑगस्ट रोजी तहसीलदारांकडे केली.

गांगलगाव हे भौगोलिक प्रचंड विस्तारित गाव आहे. गांगलगाव हे मुख्यालय असून कवठळ गाव यामध्ये समाविष्ट आहे. काटोडा, अंबाशी, कोलारा, रोहडा या गावांचा काहीसा भाग देखील याच मुख्यालयात येतो.३१ मार्च रोजी तलाठी कटक सेवानिवृत्त झाले. तेंव्हापासून हे पूर्णवेळ पद रिक्त आहे. गजानन डुकरे यांना प्रभार मिळाला. परंतु सद्य:स्थितीत त्यांच्याकडे आठ गावांचा भार आहे. एका कर्मचाऱ्याकडून इतके गावे सांभाळणे शक्य नाही. 

सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी होते. सातबारा मिळण्यासाठी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. याकरिता येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.