वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर! करतवाडीच्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; दिवठाणा, सवणा परिसरात अस्वलाची दहशत! शेतकरी नेते विनायक सरनाईक म्हणतात...

 
chitta
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील अनेक भागात वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली शेतकरी जगत आहेत. बिबट्या, अस्वल, लांडगे या प्राण्यांनी आता मानवी वस्ती पर्यंत शिरकाव केल्याच्या घटना उजेडात येत आहेत. आज,२ मार्चच्या रात्री साडेआठला चिखली तालुक्यातील करतवाडी येथे बिबट्या ने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने शेतकरी या हल्ल्यातून बचावला असून सध्या उपचार सुरू आहेत.

करतवाडी शिवारात शरद तायडे (३५) यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. गावाशेजारी असलेल्या गव्हाच्या शेतात बिबट्या आल्याचे तायडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली, यावेळी विचलित झालेल्या बिबट्याने तायडे यांच्यावर हल्ला केला. तेवढ्यात गावकरी धावत आल्याने बिबट्याने पळ काढला. तायडे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा परिसरात वावर होता मात्र वनविभागाने वेळीच दखल घेतली असती तर आजचा प्रसंग उद्भवला नसता अशी चर्चा गावकऱ्यांत आहे. चिखली तालुक्यातील दिवठाणा, सवणा परिसरात अस्वलाची दहशत आहे. अनेकदा गाववस्तीवर अस्वलाचा वावर असल्याने नागरिक व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
    
शेतकरी नेते विनायक सरनाईक म्हणतात....!
   
सद्याच्या परीस्थीतीत शेतकरी गहु,हरभरा काढणीत गुंतला आहे.शेतकरी जागलीवर सुद्धा शेतात राहतात, अश्यातच करतवाडी येथे बिबट हल्ला झाल्याची आणि दिवठाणा शिवारात शेतक-यांना अस्वल दिसल्याची घटना शेतकऱ्यांमध्ये  चिंता पसरवणारी आहे.याची वनविभागाने तातडीने दखल घ्यावी व या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा त्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे.