'जिजाऊनगर'च्या नामकरणाला सिंदखेडवासियांचा विरोध का?...माहेराला लेकीचे नाव पाहून लखुजीरावांना स्वर्गातही आनंद होईल !

'जिजाऊनगर सिंदखेडराजा'असा नामविस्ताराचा मध्यममार्ग शक्य! ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख लिहितात..

 
jfyfy
बुलडाणा(विजय देशमुख): स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जन्मभूमी असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा शहराचे नामकरण 'मातृतीर्थ जिजाऊनगर' करण्याच्या शासन व प्रशासन स्तरावर हालचाली दिसू लागल्यानंतर लखुजीराव जाधवांच्या १३व्या पिढीतील काही वंशजांनी प्रस्तावित नामकरणाच्या विरोधाचा सूर लावला आहे. त्यात स्थानिक रहिवाशांनी तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील काही पक्ष व संघटनांच्या पदाधिका-यांनीही हाच सूर आळवला आहे व  नामकरणाचा प्रस्ताव रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा  इशारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.आपल्या गावाचे नाव काय असावे?हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक नागरिकांना असतो यात दुमत असू शकत नाही.पण सिंदखेडराजाच्या नव्या नामकरणाच्या विरोधात ज्या त्वेषाने आणि तत्परतेने काही घटक पुढे सरसावले आहेत ते पाहता आश्चर्य वाटण्यासारखे व अनाकलनीय चित्र समोर आले आहे.

या स्थितीला भावनांचे रंग आणि राजकीय गंध कितपत आहे याचाही उकल होणे न्यायाचे ठरेल.एका सामान्य कार्यकर्त्यांच्या निवेदनावर शासन शहराच्या नामपरिवर्तनासाठी पुढे पाऊल टाकत असतांना जाधव घराण्यातील काही वंशजांनी, राजे लखुजीराव जाधवांच्या काळापासून सिंदखेडराजा हे नाव असल्याने ते बदलू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे.११व्या शतकात बांधलेल्या निळकंठेश्वर मंदिराच्या शिलालेखात या गावाचा उल्लेख 'सिद्धपूर' तर १६व्या शतकात बांधलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या शिलालेखात या  गावाचा उल्लेख 'सिंदखेड'असल्याची माहिती समोर येते.याचाच अर्थ पाच शतकांच्या अंतराने या गावाचे नामपरिवर्तन झाले होते याला पुष्टी मिळते.

आताही पाच शतकांच्या अंतराने सिंदखेडराजाच्या नामपरिवर्तनाचा विषय कालौघात पुढे आला आहे.या शहराला 'जिजाऊनगर'नाव देण्याची मागणी जिजाऊ माँ साहेबांवरील प्रेमापोटी काही वर्षांपासून अधूनमधून कुणीना कुणी करत असतेच.दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील संतोष बंगाळे पाटील नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने २०१७ मध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सिंदखेडराजा शहराला 'मातृतीर्थ जिजाऊनगर'असे नाव देण्याची मागणी केली होती.कुठलेही राजकीय पाठबळ नसलेल्या एकट्यादुकट्या कार्यकर्त्याने केलेल्या मागणीवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते.पण कोरोना महामारीच्या काळात प्रस्तावाची कार्यवाही खोळंबली होती.अलिकडेच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामपरिवर्तनाला गती आली त्याचवेळी सिंदखेडराजाचा विषयही समोर आला.

शासनस्तरावर सुत्रे हलली आणि सिंदखेडराजाचे नामपरिवर्तन 'मातृतीर्थ जिजाऊनगर'करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवला गेला.त्यासाठी गृहविभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्था,पोस्ट व रेल्वे  आदी विभागांची नाहरकत मिळवून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे ८फेब्रूवारी २०२३ला पाठवला.त्याबाबतची माहिती   सामाजिक कार्यकर्ते संतोष बंगाळे पाटील यांनी १६फेब्रूवारी रोजी देऊळगाव राजा येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.सुरूवातीला अनेकांना हे खरे वाटले नाही.पण जिल्हा प्रशासनाने प्रस्तावाबाबत दुजोरा दिल्यानंतर सिंदखेडराजा परिसरातील कित्येकांचे डोळे विस्फारले.परिसरात फार परिचित नसलेल्या कार्यकर्त्याच्या मागणीवर शासन एवढा मोठा निर्णय घेत असल्याचे पाहून अनेकांचा 'इगो' जागा झाला.राजकिय श्रेय कुणाला मिळेल याचे आडाखे बांधले जाऊ लागले.काहीतरी काटे फिरले आणि सिंदखेडराजाचे'मातृतीर्थ जिजाऊ नगर'करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.शहराचे ऐतिहासिक नाव बदलण्यास विरोध करण्यासाठी जाधवांचेच काही वंशज सर्वप्रथम समोर आले त्यांचेसोबत भावनीक लाटेची भरती करण्यासाठी काही सिंदखेडराजावासिय पुढे सरसावले.नव्या नामकरणाचा प्रस्ताव रद्द करा अन्यथा आंदोलन करु असेही इशारे शासनाला निवेदनाद्वारे दिले गेले आहेत.या सा-या प्रकाराकडे महाराष्ट्रातील जिजाऊ भक्त स्तंभित होऊन  पाहत आहेत.

सिंदखेडराजा ही पराक्रमी राजे पिताश्री लखुजीराव जाधव यांची कर्मभूमी. स्वराज्यजननी जिजाऊंची जन्मभूमी.समस्त महाराष्ट्रीयजनांसाठी पावन भूमी आहे.सिंदखेडराजा शहराला 'मातृतीर्थ जिजाऊनगर' नाव देण्याच्या प्रस्तावाकडे सर्वानी अभिमानाने पाहिले जाणे अभिप्रेत आहे.पण सिंदखेडकरांची विरोधाची भुमिका अनाकलनीय आणि आश्चर्यकारकच म्हणावी!राजे लखुजीरावांपासून सिंदखेडराजा हे नाव असल्याने ते बदलू देणार नाही असा पवित्रा घेतला गेला आहे.जिजाऊ जन्मस्थळामुळे सिंदखेडराजाची ओळख आहे हे लक्षात यावे. आपली कर्तृत्ववान कन्या जिजाऊचे नाव सिंदखेडराजा नगरीला दिले जात असेल तर पिताश्री लखुजीरावांना स्वर्गातही आनंद होईल! सिंदखेडवासिय व जाधवांच्या वंशजांनी डोळसपणे या विषयाकडे पहावे आणि 'जिजाऊनगर सिंदखेडराजा ' असा नामविस्ताराचा मध्यम मार्गही दुधात साखर ठरेल. तूर्त एवढेच.