कोण म्हणत संप संपला? काही फाका हाणू नका; "विश्वास काटेकर" ने आमचा विश्वासघात केला! जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत संपच सुरूच ठेवण्याचा जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा निर्धार..!
Updated: Mar 21, 2023, 09:20 IST

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री फाका हाणत आहेत. राज्य समन्वय समितीच्या विश्वास काटेकरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पण संप बंद करण्याची घोषणा करतांना विश्वास काटेकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही.विश्वास काटेकर यांनी आमचा विश्वासघात केला. सरकारचा काय भरवसा? जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होण्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत संपातून माघार नाही अशीच प्रतिक्रिया जिल्हाभरातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
काल, २० मार्चला राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर संप मिटल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता यावरून राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने ३ महिन्यात निर्णय घ्यायचे केवळ लेखी आश्वासन दिले आहे, मात्र हे सरकार ३ महिने टिकेल का? असाही महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन लागू केल्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.आज,२३ संपकरी शिक्षकांकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. हाती काळे झेंडे आणि अंगावर काळे कपडे घालून संपकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.