बुलडाणा शहर पोलीस ठाण्याला नवीन ठाणेदार कधी? या नावांची आहे चर्चा...

 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ७ दिवस होऊनही बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नवे ठाणेदार रूजू झालेले नाहीत. सध्या बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश ताथोड हेच शहराची अतिरिक्‍त जबाबदारी सांभाळत आहेत. बुलडाणा शहराला नवीन ठाणेदार कधी भेटणार आणि कोण होणार, याबद्दल आता अंदाज बांधले  जात आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाची प्रशासकीय कार्यालये बुलडाणा शहरातच आहे. आंदोलने, मोर्चे यामुळे बुलडाणा शहर नेहमीच गजबजलेले असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त पोलीस ठाणे म्हणून बुलडाणा शहराची ओळख आहे. त्यामुळे हा डोलारा पेलवणे आव्हानात्मक असते.

आज, ७ जानेवारी रोजी पोलीस आस्थापना मंडळाची बैठक होणार होती. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे सध्या ते त्यांच्या निवासस्थानीच विलगीकरणात आहेत. त्‍यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या बैठकीतच नव्या ठाणेदारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, लोणारचे रवींद्र देशमुख आणि गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक व चिखलीत कार्यकाळ गाजविणारे  गुलाबराव वाघ या तीन नावांची सध्या पोलीस वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिघांपैकी एका अधिकाऱ्यावर बुलडाणा शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.