राज्याचे कृषिसचिव जेव्हा मोटारसायकलीवरून शेतकऱ्यांच्या बांधावर जातात...!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी म्हटलं की सोबत पोलीस ताफा, बॉडीगार्ड अन्‌ डझनभर अधिकारी... असे चित्र दिसते. मात्र राज्याचे कृषिसचिव आणि बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र आयएएस अधिकारी एकनाथ डवले हे त्यांच्या साध्या आणि सर्वसामान्य लोकांमध्ये सहज मिसळण्याच्या शैलीने प्रसिद्ध आहेत. याचाच अनुभव काल, २२ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेडच्या ग्रामस्थांना आला. शेतपिकांची पाहणी करण्यासाठी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मोटारसायकलीवरून आले आणि शेतशिवाराचा फेरफटका मारला. यावेळी त्‍यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मूळचे बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील श्री. डवले सध्या राज्याचे मुख्य कृषी सचिव आहेत. एका कार्यक्रमासाठी काल ते जिल्ह्यात आले होते. देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गावात मोठ्या प्रमाणात करडी या तेलबियावर्गीय पिकाची लागवड केली असल्याची माहिती त्‍यांना मिळाली. त्यामुळे या शेतांना भेट द्यायचे त्यांनी ठरवले. ऐनवेळी हा कार्यक्रम ठरल्याने अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली. शेतात जायला चांगला रस्ता नाही. चारचाकी वाहन जात नव्हते तेव्हा मोटारसायकलीने मी येतो, असे श्री. डवले यांनी सांगितले. मोटारसायकलीवर बसून त्‍यांनी निमखेड गावातील करडी पिकाची पाहणी केली. या गावात तब्बल ९७ एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी करडी पिकाची लागवड केली आहे. श्री. डवले यांनी यावेळी करडी पिकाचे महत्त्व व व्यवस्थापन कसे करायचे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एवढा मोठा अधिकारी आपल्या बांधावर येऊन आपल्यात मिसळतो हे पाहून गावकऱ्यांना सुखद धक्का बसला. यावेळी श्री. डवले यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी अंबादास मिसाळ, तालुका कृषी  अधिकारी वसंत राठोड, अनंत देशमुख, परिसरातील सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते.