शासनाची मदत जेव्हा यायची तेव्हा येईल, सुरूवात आपण करू! अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांची कर्तव्याभिमुख संवेदना;

देऊळगाव घुबे वादळ दुर्घटनेतील मृतक चिमुकलीच्या सईच्या कुटुंबासाठी केला मदतनिधी गोळा..
 
देऊळगाव घुबे (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वादळी वारा अन् चक्री वादळाने चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे गावात ११ जूनच्या रात्री अक्षरशः कहर केला होता. अनेकांच्या घराचे छप्पर उडाले, संसार उघड्यावर पडला. सहा महिन्यांची चिमुकली सई झोक्यातुन छप्पररासगट उडाली, यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपुर्ण परिसरात, लगतच्या गावात शोककळा पसरली, समाजमन सुन्न झाले, सर्वजण संवेदना व्यक्त करत होते. या सगळ्या भीषण परिस्थीतीचा आढावा घेताना अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील हे देखील अस्वस्थ होते. गावातील चक्रीवादळ ग्रस्त लोकांसाठी मदत केली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. स्वतः पासून सुरुवात करत गावातील सामान्यातल्या सामान्य माणसाकडून त्यांनी मदत निधी गोळा करायला सुरुवात केली. आतापर्यंत मृतक सईच्या कुटुंबीयांना रोख ५८ हजार ७०० रुपयांची मदत मिळाली. 'शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आधी आपण केली पाहिजे ' असे ठाणेदार पाटील म्हणतात. यासंकल्पनेतून ठाणेदार विकास पाटील यांची 'कर्तव्याभिमुख संवेदना' झळकली !