काय राव...दारूला ५० रुपये दिले नाही म्हणून कुणी असं करत का? मेहकर तालुक्यातील विश्वी गावात काय घडलं....
Jul 13, 2024, 15:51 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दारू पिण्यासाठी माणूस कुठल्या थराला जाईल याचा काही नेम काही! दारुसाठी शिव्या देणारे आपण पाहिले असतील, किरकोळ वाद घालणारे दिसतील. पण दारू पिण्यासाठी पन्नास रुपये दिले नाही म्हणून एकाला चक्क जीवघेणी मारहाण झाल्याची घटना आता समोर आली आहे. मेहकर तालुक्यातील विश्वी गावातील हा प्रकार आहे.
विश्वी हे गाव डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येते. गावात योगेश उर्फ चिका गणेश राठोड नामक एक तरुण राहतो. त्याला दारू पिण्याची वाईट सवय आहे. दरम्यान, ६ जुलै रोजी गावातीलच रहिवासी सचिन वाघमारे हे शेताकडे निघाले होते. यावेळी अचानक योगेश उर्फ चिका राठोड हा त्याच्या दुचाकीने त्यांना आडवा आला. त्याने रस्त्यातच आडवी गाडी उभी केली. मला दारू पिण्यासाठी पैसे पाहिजे असे म्हणून योगेश याने सचिन यांना ५० रुपये मागितले. माझ्याजवळ पैसे नाही असे सांगत सचिन वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या योगेश राठोड याने अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली.
जातीयवादी शिवीगाळ करत त्याने सचिन वाघमारे यांच्या तोंडावर बुक्का हाणला. यामुळे त्यांच्या नाका तोंडातून रक्त निघाले. एवढेच नाही तर, योगेश याने काठी घेवून हातापायावर व पाठीवर वार केले. याप्रकारे जीवघेणी मारहाण केल्याने सचिन वाघमारे खाली कोसळले होते. त्यावेळी गावातीलच शेख नवाज शेख निजाम हे तिथे आले. वाघमारे यांना गंभीर जखमी अवस्थेत पाहून त्यांनी त्यांच्या घरच्यांना कळविले. असे तक्रारीत म्हटले आहे. यांनतर सचिन वाघमारे हे आपल्या घरच्यांसह डोणगाव पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांच्या सूचनेवरून सचिन वाघमारे यांना प्रथमतः अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सचिन वाघमारे यांच्या तक्रारीवरून, डोणगाव पोलिसांनी योगेश उर्फ चिका राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.