चिखलीत "त्या" रात्री नेमक काय घडल? १७ पानांच्या FIR मध्ये पोलिसांनी काय लिहिलंय?

खासदार प्रतापराव जाधवांचा पोलिसांवर एवढा रोष का? ज्या गाण्यावरून दोन गटात राडा "ते" गाणं कोणत होत? सगळ्या प्रश्नांची उत्तर वाचा बातमीत
 
sm

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   १६ मे च्या रात्री चिखलीत सैलानीनगर परिसरात दोन गटात राडा झाला.  आधी लग्नात डिजेवर वाजलेले एक गाणे काहींना खटकले, त्यातून थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन वाद दोन सामाजिक गटापर्यंत पोहचला, यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी ३० पेक्षा अधिक जणांविरुद्ध यात गुन्हा दाखल केलाय. शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप हेसुद्धा यात जखमी झालेत, त्यामुळे राजकीय नेत्यांनी देखील या वादात उडी घेतल्याचे दिसले. खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांनी जखमींची भेट घेतली. सैलानी नगर परिसरात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत असं खासदार जाधव यांनी म्हटलय. याशिवाय त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केलाय. पोलिसांनी खुन्नस मनात ठेवून शिवसेना शहर प्रमुखांना मारहाण केल्याच खासदार जाधव यांनी म्हटल आहे.

मेरे भारत का बच्चा बच्चा ,जय जय श्री राम बोलेगा, हे गाणं खटकल..!

प्राप्त माहितीनुसार १६ मे रोजी चिखली शहरात सैलानी नगर परिसरात लग्नाची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत डिजे वर "मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा" हे गाणे वाजत होते, त्यावर वऱ्हाडी नाचत होते. त्या परिसरात राहणाऱ्या काही स्थानिकांनी त्या गाण्यावर आक्षेप घेतला, हे गाणे इथे वाजवू नका असे बजावले. यावरून वऱ्हाडी आणि स्थानिकांत शाब्दिक बाचाबाची झाली. इथे प्रकरण निवळल्यानंतर लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी मंडळी परत जात असताना काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी वऱ्हाडी मंडळींवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाला धार्मिक वळण येत असल्याचे पाहून दंगाकाबू पथकाला देखील पाचारण करण्यात आले.

 दोन गट आमने सामने, घोषणाबाजी अन् लाठीमार..!

दरम्यान ही वार्ता पसरताच दोन समाजाचे गट आमने सामने आले.चिखली साकेगाव रोडवर प्रचंड गर्दी जमली. दोन्ही गट एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी करीत होते. काहीच्या हातात काठ्या तर काहींच्या हातात दगड होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. यात शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप यांच्यासह काहीजण जखमी झालेत.

jb

( जाहिरात )

पोलिसांच्या FIR मध्ये काय?

याप्रकरणात स्वतःहून पोलिसांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. पोहेकॉ राजेश बाहेकर यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. त्यावरून दोन्ही गटातील ५० ते ५५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.  आरोपींची संख्या अधिक असल्याने तब्बल १७ पानांचा FIR नोंदविण्यात आलाय.  ५५ पैकी ३० जणांची नावे पोलिसांनी FIR मध्ये लिहिली असून उर्वरित २० ते २५ आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जमावाने पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही. एकमेकांशी लोंबाझोंबी करून हातातील काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक येताच ते पळून गेले असे पोहेकॉ राजेश बाहेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

  आरोपींची नावे वाचा?

१)सैय्यद अबरार सैय्यद जब्बार २) सैय्यद फारुख सैय्यद सरदार ३)शेख असार शेख सरदार ४) जावेद खाँ अजिज खॉ ५) दत्तात्रय भगवान राऊत ६) बंडु संपत गाडेकर ७) अक्षय जैवाळ ८) रुषी जैवाळ ९) शेख फारुख शेख अनसार १०) मोहम्मद जावेद मोहम्मद जाकीर ११) अकिद खाँ निसार खाँ १२) अक्रम शेख १३) नदीम शेख १४ ) श्रीहरी खंडागळे १५ ) पप्पु जागृत १६) सतीश राऊत १७ ) नितीन बोराडे १८) मो. दानिश मो. जावेद १९) शेख सरदार शेख अनसार २०) आफ्रीदी हबीब २१) छोटु खलसे २२) हरी बोराडे २३) राम सवडतकर २४) विलास घोलप २५) शेख अक्रम शेख अफसर २६) परवेज अहमद रियाज अहमद २७) शईद उर्फ सदाम सय्यद सरदार २८) गोटया उर्फ समाधान गोराडे २९) संतोष अग्रवाल ३०) शेख राजीक 

पाकिस्तान जिंदाबाद चे नारे..?

यावेळी घटनास्थळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप उपस्थित होते. आपल्याला पोलिसांकडून जाणून बुजून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय. घटनास्थळी काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा दावा देखील घोलप यांनी केला आहे.

 खासदार जाधव म्हणाले, खुन्नस ठेवून...
  
याप्रकरणानंतर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. दुसऱ्या दिवशी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड देखील पोहचले.यावेळी खासदार जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. लग्नात वाजवण्यात येत असलेले गाणे आक्षेपार्ह नव्हते, कुणाच्या भावना दुखावणारे नव्हते तरीही त्यावर आक्षेप घेण्यात आला. काही शिवसैनिकांनी सामंजस्याची भूमिका घेत गाणे बंद केले मात्र त्यानंतरही काही वेळाने विशिष्ट समाजाच्या लोकांनी लग्नातील मंडळींवर व काही घरांवर दगडफेक केली. शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप यांनी अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन पोलिसांना दिले होते, याची खुन्नस मनात ठेवून पोलिसांनी त्यांना जास्त मारहाण केल्याचा आरोप खासदार जाधव यांनी केला आहे.घटनास्थळी जातीय तेड निर्माण करणाऱ्या आणि देशविरोधी घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत असेही खासदार जाधव यांनी म्हटले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतात..

घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, काहींना अटक देखील केली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पूर्णपणे शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी केले आहे.