क्या बात! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्येच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी! अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांची माहिती
Jan 10, 2024, 19:37 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतिक्षा रामेश्वर जायभाये हिच्या हस्ते जिजाऊंना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी ही माहिती दिली.
जाहिरात 👆
देशाला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव राज्यभर धुमधडाक्यात साजरा केला जातो. जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ राजवाडा उजळून निघतो. देशभरातून जिजाऊ भक्त अभिवादनासाठी मातृतीर्थावर येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गतवर्षी जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांची कन्या अभिता हिच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. मात्र यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतीक्षा रामेश्वर जायभाये हिच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या २० वर्षीय कन्येला हा मानसन्मान देण्याच्या निर्णयामुळे अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली भावना त्यांनी निर्णयाद्वारे अधोरेखित केली आहे.