नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा; जिल्हा प्रशासनाकडून 'या' सूचना जारी!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओमिक्रॉनचे सावट जिल्ह्यावर असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठीही राज्‍याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. थर्टिफर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात २५ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे. कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

नववर्ष स्वागत कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतर राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-१९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद आहे.