आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही! चांडोळच्या ग्रामस्थांनी अशी भूमिका का घेतली?

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चांडोळ येथील जि. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता नविन शैक्षणिक सन्त्रास सुरुवात होत आहे. परंतु येथील पालकांनी शाळेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आधी शिक्षकांच्या रिक्त जागा भरा तरच मुलांना शाळेत पाठवू अन्यथा मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय पालक व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षकच नसेल तर काय फायदा? चांडोळ येथील जि. प. उर्दू प्राथमिक शाळेत १ ते ८ वी पर्यंत २५० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत गुणवत्ता टिकून ठेवली आहे. परंतु इयत्ता आठ वर्गासाठी सहा शिक्षक आहेत. त्यातील एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आहे तर आंतरजिल्हा बदलीने आणखी एक शिक्षक कमी झाला आहे. म्हणजे आता आठ वर्गांसाठी चारच शिक्षक आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पालकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे जोपर्यंत शाळेत शिक्षक नियुक्त करण्यात येणार नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नसल्याची आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे. काही पालकांनी आपली पाल्चे जि. प. शाळेतून काढून खासगी शाळेत टाकण्याचाही इशारा दिला आहे.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणतात..
शिक्षकाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. काहींनी आपली मुले खासगी शाळेत टाकण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जि. प. शाळेची पटसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. शिक्षकांसाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. नवीन शैक्षणिक सत्रात पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका घेतली असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मोईन मुक्किम म्हणाले.