धीरेंद्र महाराजांवर महाराष्ट्रातील पहिला गुन्हा बुलडाण्यात दाखल करू! आझाद हिंद वारकरी संघटनेचा इशारा

 
5tfsg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र थोर संतांची भूमी आहे. मात्र संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले ते निंदनीय आहे.धीरेंद्र महाराज कृष्ण शास्त्री या सनातनी हिंदुत्ववादी महाराजांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात येण्यासाठी मज्जाव करावा, अन्यथा त्यांचे विरोधात महाराष्ट्रातला पहिला गुन्हा बुलडाणा शहरात दाखल करू, असा इशारा आझाद हिंद वारकरी संघटनेच्या वतीने विधिज्ञ सतीशचंद्र रोठे यांनी दिला.

संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बागेश्वर महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.तुकाराम महाराजांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीवर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच बोलावे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मंबाजी रामेश्वर भटाला माफ केले होते.

मात्र आजाद हिंद वारकरी संघटना माफ करणार नाही.तुकाराम महाराजांबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगतानाच अशा प्रकारे संतांवर कोणी बोलू नये म्हणून कायदा करणे आवश्यक असल्याचे मत रोठे यांनी व्यक्त केले. दरम्यान सरकारने धीरेंद्र शास्त्री महाराजांना महाराष्ट्रात येण्यासाठी मज्जाव करावा, अन्यथा महाराष्ट्रातला पहिला गुन्हा बुलडाणा शहरात दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.