Amazon Ad

आम्ही मुंडन केलंय! 'बोल तेरे साथ क्या..?' बुलडाण्यात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन! महेश मांजरेकरांच्या विरोधात तीव्र संताप...!!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या एका वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान करणारा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर आज ३१ जानेवारीला मुंडन आंदोलन करण्यात आलं. श्राद्ध देखील घालण्यात आलं आणि मांजरेकरांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.'बोल तेरे साथ क्या..?'असाच या आंदोलनाचा सूर होता.

मांजरेकरांच्या काळे धंदे या वेब सीरिजमध्ये एका कुटुंबात लग्न समारंभाच्यावेळी बँड पथकाला खालच्या दराची वागणूक दिल्याचं दाखवण्यात आलं. स्वतः मांजरेकरांनी हा सीन दिग्दर्शित केला होता. या सीनमुळे महाराष्ट्रभरातील डीजे व बँड पथक यांची मनं दुखावली गेल्याचं सांगण्यात आलं. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सीरिजमध्ये बँड चालकांना शिवीगाळ करत असल्याचेही दाखवण्यात आले.बँड पथक व्यावसायिक हे अनेकांच्या शुभ कार्यात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्वीगुणीत करतात. तसेच या वादनातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालवतात.या पथकांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक कामं करतात मग अशा लोकांविषयी इतक्या खालच्या पातळीवर जर चित्रीकरण केलं गेलं असेल तर ते फार निंदनीय आहे. त्यामुळे मांजरी करांच्या बेताल वक्तव्याने चिडून जाऊन लहुजी शक्ती सेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलं.

 शिवाय मातंग समाजाच्या विविध मागण्या संदर्भातही निवेदन एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ एच पी तुम्मोड यांना दिले. निवेदनात म्हटले की,अ.जा. आरक्षणाची अ ब क ड प्रमाणे तात्काळ वर्गवारी करून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे, सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथील अवैध फटाका कारखान्यातील स्फोटाद्वारे घडलेल्या जळीत कांडातील मृत्युमुखी महिलांच्या परिवारास न्याय देऊन संबंधित पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.