घरासमोर चकरा मारत होता... नववीतील मुलीचे अपहरण!; बुलडाणा तालुक्यातील घटना

 
देऊळघाटच्या अल्पवयीन मुलीचे धाडच्या तरुणाने केले अपहरण!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नववीत शिकणाऱ्या मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील दहिद बुद्रूक येथे समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी काल, १४ जानेवारीला बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून योगेश ऊर्फ गणेश राऊत (२३, रा. दहीद बुद्रूक, ता. बुलडाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १६ वर्षीय मुलगी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने घरीच होती. वर्षभरापासून गावातील  योगेश राऊत हा त्यांच्या घरासमोर नेहमी मोटारसायकलीवर चकरा मारत होता.त्याने मुलीला मोबाइलसुद्धा घेऊन दिला होता. मात्र मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो मोबाइल विहिरीत फेकून दिला होता. योगेशची समजूत काढूनसुद्धा काहीच फरक पडत नव्हता. त्याचे घरासमोर चकरा मारणे सुरूच होते.

मात्र बदनामीच्या भीतीपोटी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली नव्हती. काल, १३ जानेवारीला मुलगी आणि तिची आई दोघी दुपारी घरी असताना योगेशचे चकरा मारणे सुरू होते. दरम्यान, दुपारी दोनला घरामागच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन येते, असे म्हणत मुलगी निघून गेली. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती आलीच नव्हती, असे तिने सांगितले. संशय आल्याने योगेशच्या घरी जाऊन गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांनी विचारपूस केली. तेव्हा तोसुद्धा दुपारपासून फरारी असल्याचे समोर आले. दोन दिवस शोध घेऊनही ते मिळून आले नाही. अखेर संध्याकाळी मुलीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस  ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी योगेशविरुद्ध गुन्हा दाखल केला.

१५ वर्षीय मुलगी शाळेत पोहोचलीच नाही...
शेगाव शहरातील संविधान चौकात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केल्याची घटना १३ जानेवारी रोजी समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी काल, १४ जानेवारी रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.