व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाची मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत बैठक! प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचा अभ्यास गटात समावेश! आ.संजय गायवाडांनी पत्रकार आणि सरकारमध्ये घडवून आणली बैठक..!

 
नागपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या विविध मागण्यांसंदर्भात व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात त्यांच्या शिष्टमंडळांची आज मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत विधानभवनातील दालनात बैठक झाली. पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, अभ्यासागटाच्या अहवालानंतर पत्रकारांसाठी आर्थिक महामंडळ सुरू करण्यात येईल असा शब्द यावेळी मंत्री शंभुराजे देसाई यांनी सरकारच्या वतीने दिला. या अभ्यासगटात व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचा समावेश करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी मध्यस्थी करीत सरकार आणि पत्रकारांमध्ये ही बैठक घडवून आणली.
मागील आठवड्यात पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने नागपुरात ३ दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी या उपोषण मंडपाला भेट देत सरकार आणि पत्रकार यांच्यामध्ये बैठक घडवून आणण्याचा शब्द दिला होता. शब्दाला जागत आमदार संजय गायकवाड यांनी आज हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री शंभुराजे देसाई यांच्यासोबत त्यांच्या दालनात व्हॉईस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. यावेळी पत्रकार कल्याणकारी महामंडळा, पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प, पत्रकारांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण, प्रत्येक जिल्हास्थानी पत्रकार भवन, पत्रकारांना विमा सुरक्षा, पत्रकार पेन्शन, अधीस्वीकृती योजनेत सुलभता यासह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांच्या मागण्या रास्त असून त्याबद्दल सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी राज्य सरकारने पत्रकारांसाठी नेमलेल्या अभ्यासगटात अनिल म्हस्के यांचा समावेश करीत असल्याची घोषणा मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली.