साहेबांची वाट पाहून ग्रामस्थ थकले, संतप्त राष्ट्रवादीने 'अनोखे' आंदोलन केले! जळगाव जामोद पंचायत समितीमधील प्रकार..
Jul 12, 2024, 19:28 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जळगाव जामोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गैरहजर असल्याने आदिवासी, ग्रामीण राहिवासीयांची कामे रखडली. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या पदाधिकाऱ्यांनी 'बीडीओ'
कक्षाच्या दरवाज्याला बेशरमा ची झाडे लावून आज अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
दीर्घ काळापासून प्रशासक राज असल्याने आणि सभापती, उप सभापती सदस्य नसल्याने जळगाव जामोद पंचायत समितीमधील प्रशासन कोलमडले आहे. गट विकास अधिकारी ते कर्मचाऱ्यांना कुणाचाच वचक राहिला नसल्याचा आरोप होत आहे.
आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील शेकडो आदिवासी व अन्य प्रवर्गातील शेतकरी , ग्रामस्थ विविध शासकीय योजनांचे लाभार्थी दूरवरच्या गावावरून जळगाव पंचायत समितीत येतात. मात्र अधिकारी वा कर्मचारी हजर नसल्याने त्यांची कामे रखंडतात. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान ,वेळेचा अपव्यय होतो .याशिवाय घरातील , शेतीची कामे रखंडतात तर काहींना दिवसभरच्या मजुरीवर पाणी सोडावे लागते. आज शुक्रवारी दुपारी असाच प्रकार घडला . ग्रामस्थ , लाभार्थी आणि आदिवासी बांधव आपापल्या कामासाठी 'सायबा'ची वाट पाहत बसले. मात्र 'बीडीओ' च्या कक्षाचे दाराला कडी लावलेली असल्याने बसून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जामोद तालुक्यातील पदाधिकारी नेमके याच वेळी पंचायत समिती कार्यालयात आले.
येत्या सोळा जुलै रोजी आयोजित घरकुल लाभार्थ्यांसाठीच्या हल्लाबोल आंदोलना संदर्भात गट विकास अधिकारी एस.एम. पाटील यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. यावेळी पाटील यांचे कक्ष बंद होते आणि ते नेहमीप्रमाणे गैरहजर होते.
नेहमी प्रमाणे आज पण गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याने पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता थातुरमातुर उत्तरे मिळाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या दाराला बेशरम चे झाड लावुन निषेध व्यक्त केला.
प्रशासक राज मुळे अधिकाऱ्यांची मनमानी!
दरम्यान तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना या मनमानीचा निषेध केला. पंचायत समितीत प्रशासक राज आहे. यामुळे सभापती, उप सभापती, सदस्य नसल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असुन लोकप्रतिनिधीच त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही, त्यांच्यावर कुठलाच वचक राहिलेला नाही असा आरोप तालुकाध्यक्ष संपकाळ यांनी यावेळी केला.
'बेशरम' आंदोलनात तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, शहर अध्यक्ष इरफान खान, विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील, एजाज देशमुख, पुरूषोत्तम ताकोते, विशाल वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.