महावितरणच्या भोंगळ्या कारभाराचा बळी; वखराची दांडी ताराला लागली, शॉक लागून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू! पुढच्या वर्षी होणार होता वकील.. लोणार तालुक्यातील घटना.

 
लोणार(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेतातील कामे करत असताना खाली लोंबकळलेल्या वीज प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या तीव्र झटक्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. काल ५ जूनच्या दुपारी लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात प्रकाश आत्माराम वाघ यांच्या शेतात ही दुर्घटना घडली. फरान खान सुभान खा पठाण असे मृत युवकाचे नाव आहे.
Anniversary
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रकाश वाघ यांच्या बैलगाडीत शेतात वखर पाळी करण्यासाठी घरून वखर घेतला. बैलगाडी वाघ यांच्या शेतातील गोट्याजवळ उभी केली. बैलगाडीतून वखर खाली घेत असताना फरान यांनी तो वखर खांद्यावर घेतला. दरम्यान, वखराची दांडी शेतात लोंबकळलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाली. त्यामध्ये विजेच्या तीव्र झटक्याने फरान खाली कोसळले. प्रकाश वाघ यांनी त्यांचा चुलत भाऊ सिकंदर खा पठाण यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून फरान खा यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र तपासणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फरान हा एलएलबी च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो आई वडिलांना एकुलता एक होता.
महावितरणचा भोंगळा कारभार! 
महावितरणाने मान्सूनपूर्व कामे केली नाही. शेतामधून जाणाऱ्या विजेच्या तारा खाली लोंबकळलेल्या होत्या. याच तारांचा स्पर्श झाल्याने फरान खा याला शॉक लागला. महावितरणने वेळीच लक्ष देवून कामे केली असती तर फरानचा जीव वाचला असता. दरम्यान, याघटनेनंतर महावितरण विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे.