वणवा पेटला!; ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले!!

शेतकरी आंदोलन LIVE : वाहनांच्या रांगा लागल्या, शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्‍नत्याग सत्याग्रहाचा आज, १९ नोव्हेंबरला तिसरा दिवस उजाडला. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या आंदोलनात आज हजारो शेतकऱ्यांनी सकाळी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला. आंदोलनामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. शेकडो शेतकऱ्यांना दुपारपर्यंत पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

शेतकी

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरला सकाळी नागपुरातील संविधान चौकात अन्‍नत्याग सत्याग्रहाला सुरुवात केली होती. आंदोलन दडपण्यासाठी नागपूर पोलिसांनी रात्रीच तुपकरांना अटक करून काल, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी बुलडाण्यात आणून सोडले होते. मात्र बुलडाण्यात आल्यानंतरही तुपकरांनी निवासस्थानाबाहेरच आपला सत्याग्रह सुरूच ठेवला. तीन दिवसांपासून उपाशीच असल्याने आज, १९ नोव्हेबरला सकाळी तुपकरांची तब्येत बिघडली आहे. प्रशासनाने आंदोलनाकडे दूर्लक्ष चालवल्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ठरल्याप्रमाणे आज सकाळी आठपासून पूर्वनियोजित ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.

बुलडाणा- खामगाव मार्गावरील वरवंड फाट्यावर शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊला हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अखेर साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाहतूक पूर्ववत झाली. बुलडाणा- चिखली मार्गावरील येळगाव, चिखली- खामगाव रोडवरील सोमठाणा फाटा व पेठ फाटा येथे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चिखली- देऊळगाव राजा मार्गावरील मेरा फाटा व देऊळगाव मही येथे रास्तारोको आंदोलन सुरू असल्याने दोन- तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वृत्त लिहीपर्यंत चिखली- मेहकर, बुलडाणा- धाड, खामगाव- अकोला, खामगाव - नांदुरा ,बुलडाणा -मोताळा या मार्गावर रास्तारोको आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पहा व्हिडिओ ः

या आहेत मागण्या...
सोयाबीनला ८ हजार व कपाशीला १२ हजारांचा स्थिर भाव द्यावा, सोयाबीन पेंड आयात तात्काळ रद्द करावी, सोयाबीन व तेलबिया साठा मर्यादा उठवावी, १०० टक्के पीकविमा द्यावा, अतिवृष्टी ग्रस्तांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, महावितरणने लोडशेडिंग, मनमानी वीज बिल देऊ नये, रब्बीत कनेक्शन कट करू नये आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक लढा उभारला आहे. ३१ ऑक्टोबरला बुलडाण्याच्या भूमीत झालेला भव्य एल्गार मोर्चा याची नांदी ठरला. यानंतर १७ नोव्हेंबरपासून अन्‍नत्याग सत्याग्रह, १८ नोव्हेंबरला प्रभात फेऱ्या व ठिय्या अन्‌ आज चक्का जाम अशा क्रमाने परंतु शांतपणे हे आंदोलन सुरू आहे. मात्र तुपकरांना नागपुरात झालेली अटक, अन्‍नत्यागामुळे तुपकरांची गंभीर झालेली प्रकृती, अजूनही कुंभकर्णी झोपेत असलेले शासन, प्रशासन यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या  रास्ता रोको दरम्यान शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूंना वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्याचे दिसून आले. दरम्यान यामुळे यंत्रणांची तारांबळ व धावपळ उडाली.