फोन घेऊन घेऊन वैतागले ग्रामविकास अधिकारी! विश्वास काटकर समजून राज्यभरातून येतायेत फोन; लोक विचारतात, साहेब किती खोके घेतले?

मेहकरचे दिपक तांबारे म्हणतात, "तो" मी नाहीच! सोशल मीडियावर नंबर व्हायरल झाल्याने झाला घोळ..!!
 
samp
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही.. अनेकदा पंतप्रधान, मुख्यमंत्री  यांचे मोबाईल नंबर म्हणून भलत्याच कुणाचे तरी मोबाईल नंबर सर्रास व्हायरल होतात. त्यातून ज्यांचा तो मोबाईल नंबर असतो त्यांना अक्षरशः वैतागून जायची वेळ येते. असाच काहीसा प्रकार मेहकर तालुक्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत घडलाय. जुनी पेन्शन योजनेचे राज्य समन्वयक विश्वास काटकर यांनी काल, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर मेहकर तालुक्यातील दिपक तांबारे यांचा फोन सातत्याने खणखणू लागला. काही लोकांनी तर काहीच ऐकून न घेता अक्षरशः शिव्या द्यायलाही सुरुवात केली. कारण सोशल मीडियावर कुणीतरी खोडसाळ पणा करून विश्वास काटकर यांच्या नावाने दीपक तांबरे यांचाच मोबाईल नंबर व्हायरल केला होता. 

नेमके काय झाले हे तांबारे यांच्या आधी लक्षात नाही आले. मात्र फोन ,मॅसेज ची संख्या वाढल्यानंतर खरा प्रकार त्यांच्या धान्यात आला. काहींनी व्हॉट्सॲप अप वर मॅसेज करून साहेब तुम्ही किती खोके घेतले? तुम्ही आमचा विश्वासघात केला, आमचा संप आम्ही सुरूच ठेवणार असे मॅसेज केलेत. मी आता उत्तर देऊन देऊन थकलोय अशी प्रतिक्रिया तांबारे यांनी बुलडाणा लाइव्ह ला दिली.

कर्मचाऱ्यांचा काटकरांवर आरोप..!
   
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता विश्वास काटकर यांनी संप मिटवल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. ३ महिन्यात जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी दिले असले तरी ३ महिने सरकार टिकेल का? असाही प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन संदर्भात शासकीय निर्णय येत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका काहींनी घेतली, एकंदरीत या मुद्द्यावर आता सरकारी कर्मचाऱ्यांत दोन गट पडल्याचे चित्र आहे.