स्वरविहार" अभूतपूर्व अन् ऐतिहासिक!हास्याचे फव्वारे, टाळ्यांचा कडकडाट आणि अगदी शिट्ट्या सुद्धा..;व्हॉइस ऑफ मीडिया आयोजित रंगारंग कार्यक्रमाने फेडली बुलडाणेकरांच्या डोळ्यांची पारणे...

 
Buldana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):देशभक्तीपर गीत असो वा ठसकेदार लावणी.. सोबतीला गौरव मोरे आणि वनिता खरात या जोडीची कमाल टायमिंग साधलेली कॉमेडी.. सोबतच नृत्याविष्कार सादर करणारी कलाकार मंडळी अशा उत्तरोत्तर रंगत गेलेल्या स्वरविहार या रंगारंग कार्यक्रमाने बुलढाणेकरांच्या डोळ्यांची पारणे फेडली. हास्याचे फवारे, टाळ्यांचा कडकडाट आणि वयोमर्यादाच भान विसरून ज्येष्ठांनी वाजवलेल्या शिट्ट्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची उंची गाठून गेल्या. व्हाईस ऑफ मीडिया आणि बुलडाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार कल्याण निधीसाठी रविवारी सायंकाळी प्राध्यापक राजेश सरकटे व चमू यांच्या सुमधुर स्वरांमध्ये पार पडलेल्या "स्वरविहार" या कार्यक्रमाने बुलढाण्यामध्ये अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचा मैलाचा दगड रोवला..
सहकार विद्या मंदिराच्या भव्य सभागृहामध्ये २४ ऑगस्ट २०२४ ची सायंकाळ बुलढाण्यातील पत्रकारांच्या आयुष्यात अविस्मरणीय अशीच राहिली. व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात एकीचे बळ आणि दातृत्वाच्या हातांनी सजलेला हा कार्यक्रम उपस्थितांची वाह वा मिळवून गेला. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी उपाधख्य राधेश्यामजी चांडक, अनंताभाऊ देशपांडे, आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेसच्या प्रदेश नेत्या जयश्रीताई शेळके ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, चिखली अर्बन बँकेचे सतीश गुप्त, श्रीराम अर्बन चिखलीचे पंडितराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव खरात, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड, दुय्यम निबंधक सागर पवार, शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाकले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, बुलढाणा ठाणेदार नरेंद्र ठाकरे , चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील, बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार माधवराव गरुड, मराठा अर्बनचे श्रीकृष्ण जेउघाले, पुरुषोत्तम दिवटे,उपशिक्षणाधिकारी उमेश जैन ,बीडीवो समाधान वाघ, जिजाऊ अर्बनचे शिवाजीराव तायडे, एडवोकेट जितेंद्र कोठारी, राजेश देशलहरा, यासह अनेक व्हीआयपीची पूर्णवेळ उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
सुरुवातीलाच भल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवलेल्या एव्ही अर्थात चलचित्रफितीने या कार्यक्रमाचा एकूणच उद्देश भरगच्च गर्दी समोर सादर केला. त्यानंतर कोणाचेही भाषण नाही अथवा स्वागतसत्काराचा सोपस्कार या कार्यक्रमात नव्हता. होता तो थेट काळजाला भिडणाऱ्या सुमधुर स्वरांचा, गाण्यांचा तसेच गौरव मोरे, वनिता खरात यांच्या हास्यजत्रेत रसिकांना लोट पोट हसवणाऱ्या जुगलबंदीचा शब्दाविष्कार ! 
  
दातृत्वाला सलाम...
हेतू शुद्ध असला की समाज दातृत्व स्वीकारतो. पत्रकार कल्याण निधीच्या उदात्त हेतूने व्हाईस ऑफ मीडियाने चॅरिटी शोचे आयोजन करण्याचे ठरवले. सर्व पत्रकारांनी कार्यक्रमाचे आयोजन करत अगदी "लग्न घर " असलेल्या वरबापाची भूमिका निभावली. गेल्या महिन्याभरापासून याच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये झोकुन देऊन सर्वांनी काम केले.समाजाच्या दातृत्वशील हातांनी सुद्धा मोठ्या मनाने या कार्यक्रमाच्या तिकीटरुपी असलेल्या देणगीला तुफान प्रतिसाद देत सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात गर्दीचा उच्चांक मोडला.