चिखली पोलीस ठाण्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठेचा भाकर आंदोलन! कायमस्वरूपी ठाणेदार देण्याची मागणी! प्रभारी अधिकारी सारंग नवलकार म्हणाले, तुमच्या मागण्या एसपी पर्यंत पोहचवतो

 
jj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यातील "अ" वर्ग दर्जाचे  पोलीस ठाणे असूनही चिखली ला गेल्या काही महिन्यांपासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही. त्यामुळे शहरात गुंडगिरी, चोऱ्या आणि छेडखानीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी ठाणेदार देण्यात यावा या मागणीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या नेतृत्वात आज,२० जूनला चिखली पोलीस ठाण्यासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले. 
 

काही दिवसाआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ५ दिवसांत नवीन व कायमस्वरुपी ठाणेदार न मिळाल्याने शेकडो शिवसैनिकांनी आज कपिल खेडेकरांच्या नेतृत्वात चिखली पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलिस ठाण्यासमोर शिवसैनिकांनी ठेचा भाकरी खाल्ली. चिखली शहरात अवैध धंद्यांना उत आला आहे,कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे खमक्या आणि कायमस्वरूपी ठाणेदार चिखलीला ताबडतोब मिळाला पाहिजे असे कपिल खेडेकर यावेळी म्हणाले. पोलिस स्टेशन प्रभारी सारंग नवलकार यांच्याशी शिवसेना नेत्यांनी चर्चा केली, यावेळी शिवसेनेची मागणी आपण पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहचवू, ठाणेदार देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक घेतील असे सारंग नवलकार म्हणाले. कायमस्वरूपी ठाणेदार द्यायला एवढा विलंब का होतोय अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्याबद्दल मला सांगता येणार नाही, तो माझ्या अधिकार क्षेत्रातील विषय नाही असे प्रभारी ठाणेदार सारंग नवलकार म्हणाले. या आंदोलनात कपिल खेडेकरांसह, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, तालुका प्रमुख किसन धोंडगे, रवी पेटकर, मंगेश इंगळे, दत्ता देशमुख, दत्ता सुसर, शैलेश डोणगावकर, संतोष बापू देशमुख, गजानन पवार, प्रलय खरात, शेख बबलू, शेख साजिद, हरी इंगळे, गजानन कुटे, सतनामसिंग वधवा यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.