खडकपूर्णाचे दोन दरवाजे उघडले! आमदार डॉ. शिंगणे यांनी विधानसभेत मांडला होता मुद्दा; एप्रिलच्या उन्हातही परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा

 

देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खडकपूर्णा नदीकाठच्या ४४ गावांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे शनिवारी, दि. २२ एप्रिल रोजी दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले. त्यानंतर नदीपात्रात दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

  एप्रिल, मे आणि जून महिन्यात खडकपूर्णा नदीच्या काठी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा व लोणार तालुक्यातील ४४ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. यावर्षी नदीकाठच्या गावांसह परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांना शेत सिंचनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परिसरातील शेत सिंचनासह ४४ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मार्च महिन्यात विधानसभेत केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठच्या ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पाहून यंत्रणेला आदेश दिले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. या प्रकल्पातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती खडकपूर्णा धरण व्यवस्थापन उपविभागाचे देऊळगावमही येथील उपविभागीय अधिकारी तिरमारे यांनी दिली.