यंदा दोनदा सूर्यग्रहण! चंद्रग्रहण अन्‌ उल्कावर्षावही पहायला मिळणार

 
file photo
मुंबई : अंतराळात काय असेल, कसे असेल याचे कुतूहल माणसांना नेहमीच असते. याच कुतूहलापोटी माणूस अंतराळात पोहोचला आणि वेगवेगळ्या ग्रहांवर पाऊलही ठेवू लागला. मात्र अजून काही अंतराळातील गूढ पूर्णपणे उकललेले नाही. त्यामुळे माणसाला अंतराळाचे कुतूहल कायम आहे. यंदाही कुतूहल वाढविणाऱ्या बऱ्याच गोष्टी अंतराळात घडणार आहेत.

२०२२ या वर्षात सूर्याला दोनदा ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण खंडग्रास असेल आणि एकदा ते भारतातून दिसणार आहे. दोनदा चंद्रग्रहणाचा पूर्ण सोहळा अनुभवता येणार आहे.चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येईल आणि ३० एप्रिल या  दिवशी  पहिले सूर्यग्रहण दिसले. चंद्राची गडद सावली दक्षिण ध्रुवावर पडेल.

दक्षिण अमेरिका आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात याचे दर्शन होईल. मध्य आशिया आणि भारतात २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण दिसेल. हे खग्रास सूर्यग्रहण असले तरी भारतीयांना ते खंडग्रास दिसेल. १५ -१६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण दिसेल ते अमिरेकीत बहुतांश भागात दिसणार आहे. दुसरे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला दिसणार असून, उत्तर अमेरिकेसह पूर्व आशियाई देशात हा सोहळा दिसणार आहे. जूनमधील शेवटच्या आठवड्यात पाच ग्रह पाहण्याची संधी अवकाश प्रेमींना मिळणार आहे.

एकाच रांगेत पाच ग्रह दिसणार असून सूर्याच्या रांगेत बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनी एकाच सरळ रेषेत दिसणार आहे. त्यामध्ये चंद्र सुद्धा असेल. पूर्व व दक्षिण पूर्व आकाशात पहाटेच्या वेळी ते उघड्या डोळ्यांनी पाहता येतील. १८ जूनला शनी, २१ जूनला गुरू, २२ जूनला मंगळ, २६ जूनला शुक्र व २७ जूनला बुध ग्रहाचे स्पष्ट दर्शन होणार आहे. चांगला टेलिस्कोप असेल तर ते एका रांगेत पाहता येतील. १३ फेब्रुवारी ते  २३ मार्च या काळात दक्षिण पूर्व आकाशात चमकणाऱ्या शुक्राचे दर्शन सुद्धा होणार आहे. छोट्या टेलिस्कोपने तो लख्ख बघता येईल.