जिल्ह्यात तुरीचे उत्पादन घटले! दरात मात्र वाढ!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २०२१ च्या खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. मात्र दमदार पावसाने तूर चांगलीच बहरली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेला घाटा तुरीत भरून काढू, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तूर ऐन फुलात असताना ढगाळ वातावरण व धुक्याने फुलगळ झाली. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात सुद्धा मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पादनात घट झाल्याने तुरीची आवक कमी झाली. परिणामी तुरीचे भाव मात्र वधारले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने गम आणि भाववाढ झाल्याने खुशी असे काहीसे चित्र शेतकऱ्यांमध्ये आहे.

यंदा सोयाबीनच्या क्षेत्रासह तुरीच्या पेऱ्यातही वाढ झाली होती. सोयाबीन आणि कपाशीच्या शेतात शेतकऱ्यांनी तूर पेरली. पाऊस चांगला झाल्याने पीकसुद्धा चांगले आले होते. मात्र सोयाबीनच्या हंगामानंतर तूर ऐन फुलात असताना जिल्ह्यात अवकाळी पाऊस, धुके आणि ढगाळ वातावरणामुळे फुलगळ झाल्याने तुरीच्या झाडांना शेंगा कमी लागल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या जुन्या तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ते साडेपाच हजार तर नव्या तुरीला ६ हजार ते ६,७०० इतका भाव जिल्ह्यातील बाजारपेठेत मिळत आहे. देऊळगाव राजात तुरीला ६,४०० रुपये, चिखलीत ६,५०० रुपये, खामगावात ६७०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे.

व्यापारी म्हणतात...
यंदा सोयाबीन, कपाशी या पिकांना चांगला भाव मिळत आहे. कपाशीला तर विक्रमी १० हजार रुपयांपेक्षा भाव मिळत आहे. यंदा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही बाजारात तुरीची आवक झाली नाही. त्यामुळे यंदा नवीन तुरीला सुद्धा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
- विकास सोळंकी, व्यापारी चिखली

शेतकरी म्हणतात...
यंदा अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेले आहे. काही शेतातला खर्चही निघाला नाही. धुक्याने तुरीची फुलगळ झाल्याने शेंगा भरल्या नाहीत. त्यामुळे उत्पन्न कमी झाले. आता उत्पादनाची घट सरकारने भाव वाढवून भरून द्यावी.
- शिवाजी वाघ, शेतकरी, शेलगाव आटोळ