परवानगी नाकारली तरी तुपकर आंदोलनावर ठाम!

लाखो "स्वाभिमानी' शेतकऱ्यांत तणावपूर्ण उत्सुकता; राज्याची नजर खिळली नागपूरच्या संविधान चौकाकडे
 
ravikant tupkar

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निर्णायक वळणावर आलेल्या व लाखो सोयाबीन- कापूस उत्पादकांसाठी आरपारची लढत ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने अनेक अडचणींचा सामना करत निर्णायक टप्पा गाठला आहे. आता या महा आंदोलनासमक्ष संचारबंदीचे संकट उभे ठाकले आहे. नागपुरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीपायी प्रशासनाने सत्याग्रह आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन रेटण्याचा निर्धार केलाय! यामुळे १७/११ च्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या विविध टप्प्यातील आंदोलनाबद्दल लाखो शेतकरी, राजकीय वर्तुळ अन्‌ प्रशासकीय वर्तुळात तणावपूर्ण उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र आहे.


राज्याच्या ५० टक्के म्हणजे ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा झाला. कपाशीचा पेराही लक्षणीय ठरावा. मात्र आधी अस्मानी व नंतर सुलतानीने लाखो उत्पादकांना उद्‌ध्वस्त करण्याचे पाप केले. सोयाबीनचे भाव ११ हजार क्विंटलवर असताना केंद्राने लाखो मेट्रिक टन सोया पेंड, खाद्य तेल आयातीचा घातकी निर्णय घेतला. स्थानिक व्यापाऱ्यांना सोयाबीनचा साठा करण्यावर बंदी घातली. यामुळे भाव ४ हजारांवर आला. कपाशीची देखील अशीच कथा अन्‌ व्यथा. हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव अन्‌ सरकारने दिलेली मदत भिकेसारखी! मात्र या लाखो उत्पादक शेतकऱ्यांच्या अश्रू व समस्यांकडे प्रस्थापित पक्ष, नेते, सत्ताधारी व विरोधक सर्वांनीच पाठ फिरविली. साळसूद मौन बाळगले असतानाच स्वाभिमानीने त्यांचा आवाज बुलंद केला. 

३१ ऑक्टोबरला बुलडाण्याच्या भूमीत हजारोंचा एल्गार मोर्चा काढला. या यशस्वी आंदोलनातून उद्या १७ नोव्‍हेंबरपासून विदर्भ, मराठवाडा व खानदेशमध्ये टप्प्या टप्प्याने होणाऱ्या आंदोलनाचा "जन्म' झाला. संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी बुलडाण्यासह अन्यत्र पूर्वतयारी दौऱ्यात हजेरी लावून आंदोलनाचा माहौल तयार करत कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू, शेतकरी म्हणून एकत्र येऊ... असे घोषवाक्य असलेल्या आंदोलनास १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. नागपूर  येथील संविधान चौकात युवा नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बेमुदत अन्‍नत्‍यागाने या लक्षवेधी दीर्घ आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. 
१९ नोव्हेंबरला राज्यातील सोयाबीन, कापूस पट्ट्यातील गावागावात प्रभातफेऱ्या काढून चावडी व पारावर धरणे व ठिय्या आंदोलन करण्यात येतील. यापाठोपाठ १९ नोव्‍हेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेशात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरच्या गावबंद आंदोलनानंतर २१ नोव्‍हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा भडका उडणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे देखील १७ नोव्‍हेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. नेमक्‍या याच मुहूर्तावर विदर्भात रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली "स्वाभिमानी'चे आंदोलन पेटणार आहे. यामुळे राज्याचे अन्‌ राजकीय वर्तुळाचे लक्ष विदर्भाकडे केंद्रित होणार आहे.