क्षयरुग्ण शोध मोहीम २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार

 
File Photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला १५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. २५ नोव्‍हेंबरपर्यंत मोहीम चालणार आहे.

मोहिमेत पाच टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षित आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या २७.२५ लक्षपैकी ४ लाख ८ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात याकरिता २०४ पथकांची निर्मिती करण्यात आली असून, यात ४१ सुपरवायझर असतील. एकूण ५३९ कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. झोपडपट्टी, पोहोचण्यासाठी अवघड गावे, कारागृहातील कैदी, ज्या गावात जास्त रुग्ण असू शकतात अशी गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटीत कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृद्धाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व इतर स्वयंसेवक हे गृहभेटीद्वारे संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहेत. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा थुंकी नमुना गोळा करून तपासणी करीता जवळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. सर्वांनी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. डी. व्ही. खेरोडकर यांनी केले आहे.

क्षयरोगाची अशी असतात लक्षणे...
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त मुदतीचा ताप असणे, मागील तीन महिन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले रुग्ण.