ट्रेकिंग, स्नेहमिलन, वनभोजनातून मिळाले नवचैतन्य; शाहू मल्टिस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात साजरी केली गुरुपौर्णिमा
Jul 22, 2024, 16:29 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दैनंदिन कामाच्या व्यापातून आराम मिळावा, निसर्गभ्रमंतीचा अनुभव घेता यावा आणि स्नेहमीलन व्हावे या उद्देशाने राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक संदीप शेळके यांनी गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर कर्मचाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला. ट्रेकिंग, वनभोजन, स्नेहमीलन, सत्कार, गमती- जमती यासह इतर कार्यक्रमातुन सर्वांना नवचैतन्य मिळाले. तीनशेहुन अधिक जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
रविवार २१ जुलै रोजी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत ट्रेकिंग करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब सात किलोमीटर निसर्गभ्रमंतीचा आनंद घेतला. जवळपास तीनशे जण यामध्ये सहभागी झाले. संस्थापक संदीप शेळके आणि संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. सर्वत्र हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर, मोकळी हवा अशा मनमोहक वातावरणाने ताजेतवाने वाटल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून गेला हे कळले सुद्धा नाही.
ट्रेकिंग झाल्यानंतर क्रीडा संकुल शेजारील जे. जे. स्कूलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्टार अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शिपाईपासून ते मुख्याधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना संदीप शेळके यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी संस्थेकडून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच अधिक चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.