धनगर आरक्षणासाठी 'टॉवर' आंदोलन! जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत खाली उतरण्यास नकार!! समाजबांधवांचा सोनाटी मार्गावर ठिय्या
Nov 16, 2023, 18:45 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्वघोषणे प्रमाणे धनगर समाजाचे नेते गजानन माधव बोरकर आज गुरुवारी सोनाटी( ता.मेहकर )येथीलटॉवर वर चढले असून त्यांनी तिथेच ठाण मांडले आहे. त्यांच्या समर्थनार्थ धनगर बांधवांनी सोनाटी मार्गावर ठिय्या दिला आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येत नाही तोपर्यंत टॉवर वरच राहण्याचा निर्धार त्यांनी केल्याने प्रशासन व पोलीस अडचणीत आले आहे.
यापूर्वी बोरकर यांनी मेहकर येथे आरक्षणाच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात तब्बल आठवडाभर उपोषण केले होते. जिल्ह्यासह राज्यात हे आंदोलन गाजले. त्यावेळी राज्यातील प्रमुख धनगर समाजाचे पदाधिकारी मेहकरात दाखल झाले होते. त्यांच्या समर्थनार्थ मेंढ्यासह विक्रमी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ५० दिवसात कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. याला १५ नोव्हेंबर रोजी ५० दिवस झाल्यावर ही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
अधिकाऱ्याना जुमानेना
दरम्यान ७ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याना दिलेल्या निवेदनाद्वारे बोरकर यांनी १६ नोव्हेंबर ला टॉवर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बोरकर हे सोनाटी येथील टॉवर वर चढले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शेकडो समाज बांधव सोनाटी मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको करीत आहे. स्थानिय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा निर्धार केला आहे