लालपरीचा आज ७६ वा वर्धापनदिन! बुलडाणा आगाराच्या बसमधून दररोज २३ हजार प्रवाशी करतात प्रवास!दिवसाचे उत्पन्न किती? वाचा...
Jun 1, 2024, 13:37 IST
बुलडाणा(अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 'लालपरी' प्रवाशांसाठी लोकवाहिनी ठरली आहे. आज ७६ वर्षाचा अविरत प्रवास उलटून गेलाय. पुणे - अहमदनगर मार्गावर पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद जोपासण्याचे काम एसटीने केले. लालपरीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यातील प्रतेक आगारात साजरा होतोय. बुलढाणा आगारात देखील बस स्थानक परिसरात रांगोळी काढण्यात आली, तोरणे बांधली, प्रवाशांना पेढे वाटून उत्साहात वर्धापन दिन साजरा झाला. बुलढाणा आगारामध्ये ७३ बसेस असून २५ ते २६ हजार किलोमीटरचा दररोजचा प्रवास चालतो.. यामध्ये सुरत, नाशिक, पंढरपूर अश्या महत्त्वाच्या बस फेऱ्या आहेत. दिवसाला साडेसात लाखाचे उत्पन्न होते.
बुलढाणा आगाराविषयी सांगायचे झाल्यास, बुलढाणा आगरातून पहिली बस केव्हा धावली याची नोंदच नाही, ही शोकांतिका. येथे सद्यस्थितीत ३० प्रशासकीय कर्मचारी, ८ पर्यवेक्षक कर्मचारी, ४० यांत्रिक , १५७ वाहक, १७० चालक कर्मचारी कार्यरत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा आगारातील बसेस मधून दररोज सरासरी २३ हजार प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आताही अनेक अडथळे, अडचणी व आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी राज्यात ८७ हजार कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस राबत आहेत. ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे. या बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे.
दिव्यांग, शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनी अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्कयांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. याबरोबरच गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या चालवून, एसटी सर्व सामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी सेवा पुरवीत आहे. गेली ७६ वर्षे प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी 'महाराष्ट्राची लोकवाहिनी' बनली आहे.