हजारो चिखलीकरांनी अनुभवला डे - नाईट क्रिकेट च्या अंतिम सामन्याचा थरार! "शिवराणा चांडोळ" संघाने मारली अंतिम सामन्यात बाजी! आमदार श्वेताताईंच्या वाढदिवशी रात्री अडीचला पार पडला बक्षीस वितरण सोहळा
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भ मराठवाड्यातील सर्वात मोठ्या डे - नाईट क्रिकेट टुर्नामेंट ठरलेल्या चिखलीतील आमदार चषकाचा अंतिम सामना २६ मार्च च्या उत्तर रात्री पाडला. आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराजदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गजानन सोनुने यांच्या शिवराणा चांडोळ आणि राम सुरडकर यांच्या साईबाबा ११ या संघात अंतिम सामना पार पडला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कांठावर्धक ठरलेल्या या सामन्यात ८६ धावांचा पाठलाग करताना शिवराणा चांडोळ संघाने हे लक्ष ४ चेंडू आणि ६ गडी राखून पार केले.
२२ मार्चला या स्पर्धेची सुरुवात झाली होती. देशभरातील नामवंत खेळाडूंनी १६ संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत भाग घेतला. चिखलीच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १६ संघापैकी शिवराणा चांडोळ, निलेश गावंडे ११, युनिक ११ आणि साईबाबा ११ या ४ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यातून शिवराणा चांडोळ
आणि साईबाबा ११ हे संघ अंतिम फेरीत पोहचले.
अंतिम सामना आमदार श्वेताताईंच्या वाढदिवसाच्या तारखेत रात्री १२ ला सुरू करण्यात आला. नाणेफेक जिंकून शिवराणा संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ८ षटकांत साईबाबा संघाने ७ गडी गमावून ८६ धावा काढल्या. साईबाबा संघाकडून विश्वजीत राजपूत याने १४ चेंडूत ३५ तर मोईन ने १७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. शिवराणा संघाकडून शैलेंद्र कसबे ने २ षटकांत १७ धावा देऊन ३ गडी बाद केले तर अमित ने २५ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले.८७ धावांच्या मोठ्या लक्षाच्या सामना करताना शिवराणा संघाने आपले महत्वाचे ४ फलंदाज ४० धावांच्या आत गमावले. मात्र त्यानंतर सूरज आणि विशाल गुंजाळ ने अधिक पडझड न होऊ देता तुफानी फटकेबाजी करीत साईबाबा संघाच्या तोंडून विजय हिसकावला. सूरज ने १९ चेंडूत ३८ तर विशाल गुंजाळ ने ९ चेंडूत १४ धावांची खेळी केली. तत्पूर्वी प्रशांत शुक्ला ने ६ चेंडूत १७ धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विजेता संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयाचे पारितोषिक
स्पर्धेचा विजेता ठरलेल्या शिवराणा संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आमदार श्वेताताई महाले पाटील, संदीप शेळके यांच्या हस्ते विजेते व उपविजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत भन्नाट गोलंदाजी ने आपली छाप सोडणाऱ्या श्याम त्र्यंबके या खेळाडूला मालिकावीर व सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट फलंदाजांचा किताब विश्वजित राजपूत या खेळाडूने पटकावला.