ही बातमी विधवा महिलांसाठी आहे...!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक एकल, विधवा असलेल्या महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजना व कार्यपद्धतीबाबत अनभिज्ञता असते. त्यामुळे शासकीय योजनांपासून अशा महिला व अनाथ बालके वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकल अथवा विधवा महिला व अनाथ बालके यांच्या कुटूंबांना प्रत्यक्षपणे भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारीत मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे.

अशा महिलांचे या योजनेतून पुनर्वसन करण्यात येणार आहे. कोविड आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल अथवा विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून त्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार रूपेश खंडारे यााच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीची सभा ३ जानेवारीला तहसील कार्यालयात आयोजित केली होती.

गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. पथकाच्या माध्यमातून अशा विधवा महिला व बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, पथकाने याबाबत सक्रीय होऊन कार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी सभेत केले. सभेला गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित होते.