याला म्हणतात बातमी! आषाढी एकादशी असल्याने मुस्लिम बांधवांनी घेतला कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय! दुसरबीडच्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं,बंधुभाव कशाला म्हणतात..

 
dfgh
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामाजिक बंधुभाव कसा जोपासायचा असतो हे दुसरबीडच्या मुस्लिम बांधवांनी थेट कृतीतून दाखवून दिलंय. यंदा २९ जूनला हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांची बकरी ईद दोन्ही सण एकत्र येत आहेत. हिंदू बांधव आषाढीला उपवासाचे व्रत करतात तर मुस्लिम बांधव बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देतात. मात्र यंदा दोन्ही सण एकत्र आले असल्याने दुसरबीडच्या मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न द्यायचा निर्णय घेतला आहे.
 

काल,२६ जूनला माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सर्व धर्मीय कार्यकर्त्यांची भेट घेत बकरी ईद व आषाढीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी हा सलोख्याच्या निर्णय घेतला. २९ तारखेला  पवित्र आषाढी एकादशी असल्याने त्यादिवशी कुर्बानी न देता ३० जून किंवा १ जुलै रोजी द्यावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी घेतलेला हा निर्णय आदर्शव्रत आणि अनुकरणीय आहे या शब्दात डॉ.शिंगणे यांनी निर्णयाचे स्वागत केले. यावेळी दुसरबिड मस्जिद समितीचे अध्यक्ष सादिक शेख, शेख इरफान अली, शेख रज्जाक, विलासराव देशमुख, गजानन देशमुख, सुधीर निकम, शेख अमीर पटेल, शेख दिलावर, शेख अहमद, शेख रहमान, शेख अमीर हाजी, सखाराम केवट, सखाराम बिथरे, शेख इर्शाद, शेख राशद व  गावकरी मंडळी उपस्थित होते.