याला म्‍हणतात विश्वासघात! कार भाड्याने चालवायला दिली, त्‍याने बनावट नोटरी करून हडप करण्याचा प्रयत्‍न केला!!; बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्याला चालक म्‍हणून नोकरी लागल्याने आपल्या मालकीची कार युवकाने दुसऱ्याला भाड्याने चालवायला दिली. पण त्‍या बहाद्दराने ती स्वतःचीच असल्याचे भासवून युवकाच्या खोट्या सह्या करून नावावर करण्याचा कारनामा केला. कार कर्जावर घेतली असल्याने हप्ते नियमित भरले जात नसल्याचे मेसेज युवकाला येत होते. त्‍याने कार ताब्‍यात घेतली. तेव्हा कार भाड्याने चालवायला घेतलेल्या बहाद्दराने साथीदारांसोबत त्‍याच्‍यावर हल्ला चढवला आणि चावी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत वारंवार तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने युवकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अखेर न्यायालयाच्या आदेशाने कार हडपण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या भामट्याविरुद्ध काल, ६ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल अंबादास साबळे  (रा. पळसखेड नागो ता. बुलडाणा) यांच्यातर्फे महिला पोलीस कर्मचारी नंदा सुरडकर यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. गणेश भुजंगराव जाधव (३८, रा. तुळशीनगर, शिवसाई शाळेसमोर बुलडाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

सुनीलवर हल्ल्याची घटना बुलडाणा ते अजिंठा रोडवरील हाॅटेल निवांतसमोर ४ डिसेंबरला घडली होती. सुनीलने व्यवसायासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये मारुती सुझुकी डिझायर कार (MH 28 AZ2623) इंडसइंड फायनान्स कंपनीचे कर्ज घेऊन विकत घेतली होती. जून २०१९ मध्ये त्‍याला पुण्याच्या खासगी कंपनीत वाहनचालकाची नोकरी त्‍याने ही कार भाडेतत्वावर चालविण्यासाठी गणेशला दिली होती. दरमहा १८ हजार रुपये भाडे गणेशने देण्याचे ठरले होते. त्‍यातून कर्जाचा हप्ता भरला जाणार होता. ६ महिन्यांसाठी हा व्यवहार झाला होता.

गणेश सुरुवातीचे दोन हप्ते नियमित भरले. मात्र नंतर भरलेच नाहीत. त्‍यामुळे फायनान्स कंपनीचे मेसेज सुनीलला येऊ लागले. अखेर सुनील १४ नोव्हेंबरला त्‍याचे वाहन परत ताब्यात घेऊन पुण्याला निघून गेला. ४ डिसेंबरला तो वैयक्तीक कामानिमित्त पळसखेडे नागो येथे आला होता. त्यादिवशी तो बुलडाणा येथे येत असताना दुपारी साडेतीनला बुलडाणा- अजिंठा रोडवरील हाॅटेल निवांतजवळ गणेश व त्‍याचे दोन साथीदार बंटी मोकळे, सोनू मोकळे (दोघे रा. हतेडी ह. मु.  मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा) यांनी सुनीलला थांबवून मारहाण करून चावी हिसकावत कार पळवून नेली होती. या प्रकरणाची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात सुनीलने केली.

मात्र गणेशने अटक होण्याच्‍या भीतीपोटी अटकपूर्व जामिन न्यायालयातून मिळवला. सुनीलला याच काळात कळले की गणेशने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ही कार बनावट विक्री करारनामा करून घेत लिहून घेतली. आपलीच खोटी सही करून कार हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीलने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आता चौकशीअंती गणेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय नामदेव खवले करत आहेत. वृत्त लिहिपर्यंत गणेशला अटक झालेली नव्हती.