यंदाही थर्टिफर्स्ट घरातच..! हॉटेलमालक चिंतित, कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक लागणार!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पाठोपाठ पुन्हा ओमिक्रॉनची धास्ती वाढली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही थर्टिफर्स्ट घरातच साजरी करावी लागण्याची चिन्हे आहेत. हॉटेलमालकांना ५० टक्के क्षमतेने आणि पूर्ण नियमांचे पालन करून हॉटेल चालविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असल्या तरी हॉटेलचालकांत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. हॉटेलचालकांत चिंतेचे वातावरण आहे.

मागील दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून हॉटेल व्यवसाय अडचणीत आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये हॉटेल पूर्ण बंद ठेवावे लागले होते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेत मद्यविक्री सुद्धा बंद होती. गेल्यावर्षी थर्टिफर्स्टवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तर यंदाच्या थर्टिफर्स्टवर ओमिक्रॉनचे सावट आहे. ३१ डिसेंबर रोजी जिल्हाभरात अनेक ठिकाणी थर्टिफर्स्ट समारंभ आयोजित केले जातात.

छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा ग्राहकांची गर्दी असते. काही हॉटेलमध्ये आधीपासूनच टेबल बुकिंग केले जातात. मात्र आदेशात स्पष्टता नसल्याने अजून कुठेही टेबल बुक करण्यात आले नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. जिल्हाभरात ३१५ परमिट रूम आहेत. यात दारूसह जेवणाचीही सोय असते. यात थर्टिफर्स्ट साजरा करण्यासाठी अनेकांचा ओढा असतो. मात्र यंदा ओमिक्रॉन सावटामुळे परमिट रूम मालकांनी सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात १२८ देशी दारूची दुकाने आहेत. ४१ बिअर शॉपी, १८ वाईन शॉपी आहेत. या दुकानांत थर्टिफर्स्टला लाखो रुपयांची उलाढाल होत असते. याशिवाय मटन आणि चिकनची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र यंदा या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

हॉटेल व्यवसायिक म्हणतात...
ओमिक्रॉनच्या सावटामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिक धास्तावले आहेत. मागील वर्षी ३१ डिसेंबरचा व्यवसाय बुडाला. यंदा चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा होती. मात्र ओमिक्रॉनमुळे जसे आदेश मिळतील त्या आदेशांचे पालन करू.
- गणेश मांटे, हॉटेल व्यावसायिक, बुलडाणा

ओमिक्रॉनची धास्ती आहेच. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय होईल अशी आशा आहे. मागील वर्षभरापासून हॉटेल व्यवसाय अडचणीत आहेत. निर्बंध लावताना शासनाने नियमांचे पालन हीच मुख्य अट ठेवली पाहिजे. सरसकट बंद करणे हा उपाय होऊ शकत नाही. हॉटेल व्यावसायिक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी तयार आहेत.
- मनोज पंजाबी, हॉटेल व्यावसायिक, बुलडाणा