साखरखेर्डात चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच वार्डातील तीन घरांची घरफोडी; हजारो रुपयांचा ऐवज लंपास..

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) साखरखेर्डा परिसरात दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अज्ञात चोरट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, एकाच वार्डातील तीन घरांची घरफोडी करून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज दामटल्याची घटना १७ जूनला उघडकीस आली.
   याआधी अशाप्रकारची एक घटना समोर आली होती. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा आश्रम परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. त्यात घरासमोरील मोटारसायकल सुद्धा चोरट्यांनी चोरून नेली होती. या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक चार मधील तीन घरांची घरफोडी झाली. यामध्ये शेख अक्रम शेख कासम, सचिन सोळंके आणि लखन कामे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने, काही नगद पैसे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शेख अक्रम यांच्यासह तिघांनी साखरखेर्डा पोलिसात १७ जून रोजी रात्री तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाजीराव खरात करीत आहे.