सावडायला जात होते पण त्यांच्यावरच काळ ओढवला! भीषण अपघातात दोन बळी; भरधाव टिप्परने मोटारसायकलला मागून उडवले; पती -पत्नी जागीच ठार! दोन मुले पोरकी; जानेफळ लोणीगवळी रस्त्यावरची आज सकाळची घटना ​​​​​​​

 
hjfkl

मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अपघातांची मालिका काही थांबतांना दिसत नाही. समृद्धीवर झालेल्या खाजगी अपघातात २५ जणांचा कोळसा झाला, काल त्यांच्यावर बुलडाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथला चिताग्नी विझत नाही तोच पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ लोणीगवळी रस्त्यावर अपघात झाला. नातेवाईकांच्या अस्थिविसर्जनासाठी जात असलेल्या दाम्पत्यावर भरधाव टीप्पररुपी  काळाने झडप घेतली. मागून दुचाकीला उडवल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले दाम्पत्य मेहकर तालुक्यातील मोहना येथील आहेत.

देविदास भिवसन पवार (५०) इंदुबाई देविदास पवार (४४) अशी अपघातात ठार झालेल्या दांपत्याची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार दोघे पती पत्नी मोटारसायकलने विश्र्वी येथे सावडण्यासाठी जात होते. जानेफळ लोणीगवळी रस्त्यावर लावणा गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.

 या अपघातात दोघा  पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला मात्र संतप्त जमावाने यावेळी टिप्पर फोडले. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आई वडिलांचा मृत्यू झाल्याने दोन मुले अनाथ झाली आहेत.