...तर परवापासून मेहकरचे शेतकरी करणार चक्काजाम!

 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडण्याच्या मागणीसाठी घाटनांद्रा कालवा लाभधारक शेतकरी काल, ११ जानेवारीपासून घाटनांद्रा कॅनॉलजवळच बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला असून, १४ जानेवारीच्या सकाळपासून चक्का जाम करण्यात येईल, असे निवेदनच जानेफळ पोलिसांना दिले आहे.

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यासाठी मेहकर तालुक्‍यातील घाटनांद्रा, उटी, देळप, बोथा, गोमेधर, लोणी काळे, निंबा, बारडा, पारडी, घुटी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ४ जानेवारीला त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने ते कालपासून उपोषणाला बसले आहेत. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यावर कोणताच अधिकारी बोलायला तयार नसल्यामुळे कालवा लाभधारक शेतकरी वैतागून गेले आहेत.

पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पाटबंधारे विभाग व सिंचन विभाग यांचा ताळमेळ नाही. रास्ता रोकोचा इशारा सहदेव भगवान अल्हाट (वरवंड), शालिकराम राजाराम गवई (घाटनांद्रा), संतोष महादेवअप्पा साखरे, वसंता अजाबराव देशमुख, लक्ष्मीकांत बोराडे, गणेश सोनोने, नीलेश गुरळकर, श्रीकृष्ण गुरळकर, निवृत्ती आखुड, गोपाल खारोडे आदींच्या सह्या आहेत.