बुलढाणा शहराच्या चौकाचौकात भरते 'त्यांची' बैठक ; वाहतुकीला अडथळा ! बंदोबस्त लावण्याचा नागरिकांची मागणी..
Jul 1, 2024, 14:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातील चौकात चौकात मोठी बैठक भरते. सकाळी जर शहरातून फेरफटका मारला तर प्रत्येक चौकात त्यांची झुंड दिसते. मान्सूनमुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या किरणांसाठी ही सगळी मंडळी जमते असे दिसून येते. ज्यांच्या विषयी आपण बोलतोय ते आहेत, शहरातील मोकाट जनावरे. हल्ली बुलढाणा शहरात मोकाट जणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजारपेठ चिखली रोड, या रस्त्यावर गुराढोरांची बैठक बसते. यामुळे वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होतो. दरम्यान, नगरपालिकेने मोकाट जनावरांचा योग्य तो बंदोबस्त लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने मोकाट जनावरांना बंदिस्त करण्यासाठी जनावरांच्या मालकांना सुचित केले होते. यानंतर मोकाट जनावरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम देखील राबविण्यात आली होती. परंतु ती त्यावेळी पुरती मर्यादित राहिली. जनावरांना हानी झाली नाही पाहिजे, किंवा त्यांच्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली पाहिजे नाही. असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे जनावरांचा योग्य तो बंदोबस्त लावावा अशी मागणी होत आहे.