Amazon Ad

पोलीस पदासाठी शनिवारी लेखी परीक्षा ! १३६६ उमेदवार ठरले पात्र.. सहकार विद्या मंदिरमध्ये होणार परीक्षा; तीन तासाआधीच पोहोचा! का? ते बातमीत वाचा..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शनिवार, १३ जुलै रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.
या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सुचना देण्यात आल्या आहेत. पोलिस शिपाई पदाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने १९ जून ते १ जुलै २०२४ या दरम्यान उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांच्या गुणाच्या गुणवत्तेनुसार संबंधीत प्रवर्गातील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात पात्र असलेले एकूण १ हजार ३६६ उमेदवारांची निवडयादी buldhanapolice.gov.in, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
 जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी ३ तास अगोदर म्हणजेच सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेश पत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे.
लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यन्वीत राहणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन, अमिषाला बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करुन द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.