भविष्यात उच्च व तंत्रशिक्षण उपलब्ध करणार - संदीप शेळकेंचा शब्द! जिजाऊ ज्ञानमंदिरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात

 
fjj

रायपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसे देता येईल, याकडे जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनिअर कॉलेजचा कल आहे. भविष्यात उच्च व तंत्रशिक्षण उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.

पळसखेड भट येथील जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये १ मे रोजी आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राजु बोराडे, सुमंथा पाटील सिरसाट, गजानन उबरहंडे, सरपंच विजु चिकटे, अफसर चाचा, रमेश गवते, देविदास सिरसाट, कैलास सिरसाट,  दत्ताभाऊ सिरसाट यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, क्रॉप सायन्स सुरु झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.  या वर्षीपासून सर्वच वर्ग आपण डिजीटल करीत आहोत. दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना ब-याच गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता येतील. यावर्षी शालेय स्पर्धेत संस्थेच्या ९२ विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर पदके मिळवली. ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविकातून प्राचार्य किशोर सिरसाट यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राविण्यप्राप्त खेळाडूंना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गेलेल्या शाळेच्या खेळाडुंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. संचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार वैशाली भोंडे यांनी मानले.