व्हाईस ऑफ मीडियाच्या आरोग्य शिबिराला पत्रकारांचा उदंड प्रतिसाद! प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले, सेवा कार्याचा यज्ञ तेवत ठेवणार
Updated: Jan 4, 2024, 15:17 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
समाजाच्या आरोग्याची काळजी करणारे पत्रकार मात्र स्वतःकडे कायम दुर्लक्ष करत असतात. वाढलेली स्पर्धा असो किंवा धावपळीच्या आयुष्य यात आरोग्य विषयक समस्या वाढतात त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सेवा कार्याचा हा यज्ञ तेवत ठेवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सांगितले.
बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आज, ४ जानेवारी रोजी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.
सकाळी नऊच्या ठोक्याला आरोग्य शिबीर सुरू झाले. रक्त तपासणी,शुगर, बीपी, हृदयविकाराच्या संदर्भातील तपासण्या यामध्ये करण्यात आल्या. तब्बल ८० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची यावेळी तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुचवले. यानंतरही तीन दिवस नेत्ररोग तज्ञ , हृदयरोग तज्ञांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पुढील उपचार केले जाणार आहेत. त्याची तारीख देखील लवकरच घोषित होईल.
आज पार पडलेल्या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या चमूसह खाजगी वैद्यकीय तज्ञांनी देखील सेवा दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉ. आशिष लोखंडे, डॉ. वसीम चौधरी, डॉ.मनीषा चव्हाण, डॉ. वीरेंद्र काटकर, डॉ. अनुप इंगळे, श्री श्रीवास्तव, ज्ञानेश्वर मुळे, लखन सरकटे ,सिद्धार्थ जाधव, अभिजीत राजपूत, जयदीप दुपटे, हरिदास अंभोरे, रवींद्र गवई , ए.चव्हाण ,श्रीमती कविता किरोचे, शेख अखिल, जितू यमले व श्री मंगेश दलाल यांच्या सह सहकाऱ्यांनी आपली सेवा या शिबिरामध्ये दिली.
यावेळी नेत्र रोग तज्ञ डॉक्टर राहुल बाहेकर, कार्डियोलॉजिस्ट डॉ.नितीन सोनुने यांनी देखील भेट दिली.