अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे चिखलीच्या नरेंद्र पटेलांना निमंत्रण! थेट "व्हॉईट हाऊस " वर बोलावले; कारणही आहे खास...

 
Dhhj
चिखली(गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. २४ जून पर्यंत ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज,२२ जूनला अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता नरेंद्र मोदी वाशिंग्टन स्थित व्हाईट हाऊस मध्ये पोहचतील. तिथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेत स्थायिक झालेल्या निवडक भारतीयांना सुद्धा व्हाईट हाऊस ने निमंत्रण दिले आहे. मूळचे चिखली येथील रहिवासी असलेले नरेंद्रभाई पटेल देखील या कार्यक्रमासाठी वाशिंग्टन मध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वतीने व्हाईट हाऊस ने त्यांना निमंत्रण पाठवले आहे.
   
 नरेंद्रभाई पटेल गेल्या ३० वर्षांपासून अमेरिकेत आहेत. तिथल्या अटलांटा मध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय अमेरिकेत सामाजिक कार्यात देखील ते कायम अग्रेसर असतात. अमेरिकेतील अटलांटा येथे त्यांच्या ३ हॉटेल आहेत. चिखली येथेही वैजनाथ उद्योग समूह म्हणून नरेंद्र पटेल यांचे मोठे प्रतिष्ठान आहे. चिखली येथील प्रीतम सायकल चे संचालक महेंद्र पटेल यांचे ते बंधू आहेत. भारतीय पंतप्रधानांचा अमेरिकेत जो सन्मान होतोय त्यामुळे आपली छाती अभिमानाने फुलून येत असल्याच्या भावना नरेंद्र पटेल यांनी "बुलडाणा लाइव्ह" कडे व्यक्त केल्या आहेत. व्हाईट हाऊस ने दिलेल्या निमंत्रणावरून ते वाशिंग्टन मध्ये दाखल झाले आहेत. महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला नरेंद्रभाई पटेल हजर राहणार आहेत.