BREAKING अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परवाले मुजोर झाले! मंडपगावमधील छत्रपती चौकातील भगवा झेंडा उडवल्याने तणाव...

 
देऊळगावराजा
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या टिप्परने मंडपगाव (देशमुख) येथील छत्रपती चौकातील भगवा झेंडा उडवला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. सायंकाळी सहा वाजेरच्या सुमारास ही घटना घडली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
 प्राप्त माहितीनुसार मंडपगाव (देशमुख) हे गाव खडकपूर्णा प्रकल्पाच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे या भागातून सातत्याने अवैध रिती वाहतूक होते. अधूनमधून पोलीस आणि महसूल प्रशासन कारवाई करीत असल्याचा आव आणत असले तरी अवैध रेतीवाल्यांकडून "मलिदा" मिळत असल्याने असल्या कारवायांत काही दम राहत नाही असा आरोप स्थानिक गावकरी करीत आहेत. या परिसरात फिरणारे सर्व टिप्पर विना नंबरचे असतात हे विशेष..दरम्यान आज,१२ जूनच्या सायंकाळी एका भरधाव विनानंबरच्या टिप्परने मंडपगाव येथील छत्रपती चौकातील गावकऱ्यांनी उभारलेला भगवा झेंडा उडवला. यावेळी तिथे उपस्थित तरुणांनी त्या टिप्पर ला पकडले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस अधिकारी उपस्थित झाले आहे. या भागातील अवैध रेती वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करावा, भगव्या झेंडाचा अवमान करणाऱ्या टिप्पर चालकासह मालका विरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.