काळ आला होता पण वेळ आली नव्हती..! बसमध्ये ५० पेक्षा अधिक प्रवाशी असताना घाटात बसचे ब्रेक फेल झाले...! चालकाने प्रसंगावधान राखले नसते तर...! हातणी जवळची घटना

 
vbnm
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आज चिखली बुलडाणा रोडवरील हातणी जवळच्या घाटात एसटी बस मधील प्रवाशांना आला. गाडी घाटातून चढत असताना अचानक गाडीचे ब्रेक झाले, त्यामुळे बस उतारातून मागे घसरू लागली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून मोठ्या कौशल्याने बसची एक बाजू रस्त्याच्या कड्याला असलेल्या नाल्यात उतरवली अन् बस जागेवर थांबवण्यात यश मिळवले आणि बसमधील ५० पेक्षा अधिक प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 


   
 झाले असे की आज २२ जूनच्या दुपारी साडेतीनच्या सुमारास एम एच ०६, एस ८४०४ या क्रमांकाची बुलडाणा आगाराची बस चिखली वरून बुलडाण्याकडे जात होती. ५० पेक्षा अधिक प्रवाशी या बसमध्ये होते. हातणी जवळील घाटात बस पहिल्या गियर वर चढत असताना अचानक बस चे ब्रेक फेल झाले. त्यामुळे वर चढणारी बस मागच्या दिशेने वेगात घसरू लागली. बस तशीच मागे घसरली तर बस मधील प्रवाशांसह बसच्या मागे असणाऱ्या इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका होता,याची जाण अनुभवी चालक असलेल्या दिलीप इंगळे यांना होती. त्यांनी तातडीने आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बाजूला खोदलेल्या नाल्यात बस उतरवली, छोट्या नाल्यात बस फसल्याने बस जागेवर थांबली अन चालक,वाहक व साऱ्याच प्रवाशांचा जीव वाचला.

  बस मध्ये आधीच होता तांत्रिक बिघाड?

 दरम्यान या बसमध्ये आधीच तांत्रिक बिघाड होता असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चिखली आगारात ही बस धक्का देऊन सुरू करण्यात आली होती. तांत्रिक बिघाड असलेली बस प्रवाशांच्या सेवेसाठी दिलीच कशी? आधी त्याची दुरुस्ती झाली नाही का? झाली असेल तर त्यात हलगर्जीपणा झाला का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आज थोड्यावर भागले म्हणून ठीक पण दुर्दैवाने काही वाईट घडल असत तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्या बसमधील प्रवाशांनी उपस्थित केला.