रेतीमाफियांची मुजोरी वाढली; अवैध रेती वाहतुकीला कंटाळून निमगाव वायाळच्या महिला सरपंचाचा आत्मदहनाचा इशारा!

 
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून लाखो ब्रास वाळूचे दिवसरात्र उत्खनन महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरू आहे. रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप व सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी वारंवार अर्ज निवेदन देऊनही महसूल विभागाने लोकप्रतिनिधिंची दिशाभूल केली. असा आरोप महीला सरपंच सौ शिला चाटे यांनी केला आहे. सात दिवसांत निमगाव वायाळ येथील रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा २७ मे रोजी, रेतीघाटात आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा सरपंचा चाटे यांनी निवेदनाद्वारे काल २१ मे रोजी दिला.
सदर रेती घाटातील अवैध रेती उत्खननाचे मोजमाप करून घाटातील सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे व अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी येथील महिला सरपंचा चाटे यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद आहे की, सात दिवसांत कारवाई झाली नसल्यास रेती घाटात आत्मदहन करणार. या आत्मदहनास महसूल विभाग जबाबदार राहील असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. महसूल विभागाचे कर्मचारी फक्त या घाटात येवून अर्थपुर्ण व्यवहार करून निघून जातात. मात्र कारवाई करीत नाही. त्यामुळे या रेतीमाफियांची मुजोरी वाढली असून त्यांना महसूल विभागाचा आशीर्वाद आहे. असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.