बुलडाण्यात चोरट्यांचे राज्य! सहा महिन्यांत ८६ चोरीच्या घटना; तपास फक्त २९ घटनांचा..
Jun 24, 2024, 13:41 IST
बुलडाणा(अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भुरट्या चोरट्यांसाठी बुलढाणा शहर हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या सहा महिन्यात विविध प्रकारच्या चोरीच्या ८६ घटना समोर आल्या आहेत. यामध्ये केवळ २९ घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
१ जानेवारी ते २३ जून या कालावधीत जबरी चोरीच्या ७ घटना दाखल असून त्यापैकी ६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. शहरात ९ घरफोडी झाल्याचे गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. यामध्ये एका गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली. तसेच इतर चोरीचे ७० गुन्हे दाखल असून यामध्ये २२ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. सर्वाधिक दुचाकी चोरी गेल्याचे प्रमाण आहे. शांतताप्रिय बुलढाणा शहरात चोरीच्या वाढत्या घटनांनी गुन्हेगारी देखील वाढली. दिवसा ढवळ्या घरासमोर दुचाकी लंपास होणे, रविवारच्या आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणे, भंगार गोळा करण्याच्या नावाखाली साहित्य चोरी करणे अश्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. गत आठवड्यातच थेट पोलीस वसाहतीच्या इमारतीमधील साहित्य चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान दिले होते. अखेर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी भुरट्या चोरट्यांना टार्गेट केले आहे. रविवारच्या बाजारात बाजार करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
सर्वाधिक चोरी दुचाक्यांची!
७० चोरीच्या गुन्ह्यांमधून सर्वाधिक दुचाकी चोरी केल्याचे प्रमाण आहे. दिवसाढवळ्या पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळेस देखील दुचाकी चोरण्याचे चोरट्यांचा डाव आहे. दरम्यान, यांमधील काही घटना सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाल्या आहेत. उर्वरित चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बुलढाणा पोलीस विशेष प्रयत्न करीत असून नागरिकांनी देखील सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.