किनगावराजा ते पांगरी उगले रस्ता झाला बेकार ! प्रशासनाविरोधात ग्रामस्थ संतापले अन् खड्डयात लावले बेशरमीचे झाड..

 
 सिंदखेड राजा (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) किनगावराजा ते पांगरी अवघ्या पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळायला 'मार्ग' नाही. रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मान्सून सुरू असल्याने खड्डे ओसंडून वाहतात, इतरही काही कारणांमुळे हा मार्ग अतिशय खडतर ठरत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्यावरील खड्डयात बेशरमीचे झाड लावून प्रशासना विरोधात व्यक्त केला आहे.
   सिंदखेड राजा तालुक्यातील या रस्त्यांची स्थिती ढासळली आहे. बांधकाम विभागाने मान्सूनपूर्व कामे लक्षात घेता, या रस्त्यांची दुरुस्ती करायला हवी होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे देखील वाहतूक टप्पे होताना दिसून आली आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ती झाडे खाली कोलमडतात आणि वाहतुकीवर परिणाम होतो. शेतातील कामानिमित्त आजूबाजूच्या ग्रामस्थांचा नियमितचा प्रवास असतो. रस्त्यात इतकी खड्डे झाले की प्रवासी वैतागले आहेत. पाच मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तासाचा वेळ जातो. खड्डयात पाणी साचल्याने अंदाज येत नाही यामुळे वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. रस्त्याची चिंताजनक स्थिती पाहता अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे. बांधकाम विभागाने तातडीने यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या रस्त्याची सुधारणा केली पाहिजे. अशी मागणी होत आहे. या रस्त्याची अवस्था पाहता, प्रवासी प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत असून त्यांनी रस्त्यावरील खड्डयात चक्क बेशरमीचे झाड लावले. लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लागली नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास उगले यांनी दिला आहे.