एसटी संपाचा परिणाम; खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून जनतेची वारेमाप लूट!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुरुवातीला सामान्य जनतेची सहानुभूती मिळवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याबद्दल आता सामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याला कारणही तसेच आहे. गेल्या ६३ दिवसांपासून एसटी वाहतूक बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आता प्रवासासाठी खासगी वाहतूकदारांना अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागत आहे.

लग्नसराई सुरू झाली आहे. प्रवासासाठी नाईलाजाने खासगी वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. त्यामुळे एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स, काळीपिवळी व इतर खासगी वाहतूकदारांनी उचलणे सुरु केले आहे. मनाला वाटेल तेवढे भाडे खासगी वाहतूकदार उकळत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्‍य सरकारमध्ये विलिनीकरणासाठी लढा उभारला तेव्हा सामान्य जनतेनेही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर राज्य शासनाने पगारवाढ करूनही कर्मचारी कामावर परतले नाहीत. सध्या विलिनीकरणाचा प्रश्न न्यायालयात असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, असे आवाहन वेळोवेळी सरकारकडून करण्यात आले आहे.

अनेक बैठका होऊनही कर्मचारी विलिनीकरणावर ठाम राहिल्याने एसटी बस अजूनही बंद आहेत. खासगी वाहतूकदारांच्या लुटीने त्रस्त झालेली जनता आता एसटी पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहे.

अशी होतेय लूट...
बुलडाणा येथून चिखलीला जाण्यासाठी एसटी ३५ रुपये तर सध्या खासगी वाहक ५० रुपये आकारतात. बुलडाणा- उंद्री एसटीने ५० तर खासगी वाहतूकदार ७० रुपये आकारतात. बुलडाणा- खामगाव एसटीने ७० रुपये सध्या १०० रुपये मोजावे लागत आहेत. बुलडाणा- मलकापूर एसटी-७०, खासगी-१००, बुलडाणा - अजिंठा एसटी भाडे-८०, खासगी भाडे १५०, बुलडाणा -औरंगाबाद एसटी भाडे- २१०, खासगी ४००, बुलडाणा-पुणे एसटी भाडे ५५०, खासगी १०००, बुलडाणा- धाड, एसटी भाडे- ४०, खासगी-६०, बुलडाणा- नागपूर एसटी भाडे ५२०, खासगी ९०० ,बुलडाणा-मेहकर एसटी भाडे १००, खासगी -१५० रुपये.

एसटी गाड्या बंद आहेत. लग्नाचे जाणे गरजेचे आहे. खामगावला जायला आधी ७० रुपये लागायचे.आता जाण येणं करायचं असल्यावर ५०० रुपये जवळ पाहिजेत. काळी पिवळीशिवाय दुसरा पर्याय नाही.
-शकुंतला निकाळजे, प्रवासी, बुलडाणा