बुलडाणा जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. खून, बलात्कार, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे, लुटमार, दंगली, फसवणुकीचे प्रकार, जुगार, अवैध दारू, अपहरण या सगळ्याच गुन्ह्यात संख्यात्मक वाढ झाली आहे. काही प्रकरणांत गुन्ह्यांची १०० टक्के उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना पाहिजे तसे यश मिळाले नाही.
अशी झाली वसुली...
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत दरोड्याच्या ८ घटनांची नोंद आहे. या ८ प्रकरणांत ५ पेक्षा अधिक दरोडेखोरांनी तक्रारदारास इजा पोहचवून मुद्देमलाची लूट केली, एकूण ८ गुन्ह्यात दरोडेखोरांनी ५३ लाख १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबवला. विशेष बाब ८ पैकी ८ गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात बुलडाणा पोलिसांना यश आले, यात "टीम एलसीबी" चा वाटा मोलाचा आहे. दरोडेखोरांकडून पोलिसांनी ४२ लाख ५८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल वसुल केला.
जिल्ह्यात ६ महिन्यात रॉबरी अर्थात जबरी चोरीच्या(१ ते ४ गुन्हेगारांनी मिळून केलेल्या) ५० गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्यापैकी ३४ गुन्ह्यांची उकल केली. भामट्यांनी चोरलेल्या ५३ लाख ५१ हजार ३३० रुपयांच्या मुद्देमालापैकी केवळ २ लाख ६२ हजार ४४२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. दरोडा, रॉबरी, घरफोडी, छोट्या चोऱ्या असे एकूण ७२० गुन्हे घडलेत त्यापैकी १६५ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली. चोरलेल्या ५ कोटी १६ लाख ६३ हजार ५५० रुपयांपैकी २ कोटी २६ लाख ७६ हजार ४४७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी वसुल केला. पोलिसांच्या यशस्वी तपासाची टक्केवारी २५ टक्के आहे. गेल्यावर्षी याच काळात ५७४ गुन्ह्यांची नोंद होती, तेव्हा पोलीसांच्या यशस्वी तपासाची टक्केवारी ३६ टक्के एवढी होती.
जुगाराचा खेळ रंगला, पण ...
जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत जुगाराच्या १०७६ गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी छापेमारी केलेल्या डावांत २८ लाख ९८ हजार २५४ रुपयांचा मुद्देमाल वसुल केल्याचा कागदावरील आकडा आहे. शिवाय प्रतिबंधात्मक ॲक्ट नुसार अवैध दारू, अवैध गांजा, अंमली पदार्थ, गुटखा यावर पोलिसांनी २२२८ कारवाया केल्याची नोंद आहे, ज्यामधून पोलिसांनी ५९ लाख ९५ हजार ४८१ रुपयांचा मुद्देमाल वसुल केला आहे.